ज्याच्यावर प्रेम केलं, त्यानेच पैशांसाठी विकले!; १६ वर्षीय मुलीचे अनेकांनी तोडले लचके!!
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, १६ वर्षीय मुलगी गोपालगंज येथील कुचायकोट भागात राहते. संजयने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तीही त्याच्यावर जीवापाड प्रेम करू लागली. दोघांनी लग्नाच्या आणाभाका घेतल्या. मी तुझ्याशीच लग्न करणार, असे म्हणते त्याने तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ४ महिन्यांपूर्वी संजयने प्रेयसीला उत्तर प्रदेशातील तमकुहीमध्ये ३५ हजार रुपयांत विकले. तिथे तिला बंधक बनवून नेपाळला नेण्यात आले.
नेपाळच्या एका वेश्या वस्तीत दीड लाख रुपयांत तिचा सौदा झाला. तिथे तिला एका खोलीत कैद करण्यात आलं. केवळ खाण्यापिण्यासाठी तिला खोलीबाहेर येऊ देत होते. अल्पवयीन असल्याने तिथे वासनेची भूक भागविण्यासाठी येणाऱ्या अनेकांनी तिचीच निवड करत तिच्या देहाचे अक्षरशः लचके तोडले. यादरम्यान तिथे राहणाऱ्या एका नेपाळी महिलेने तिची मदत केली. मुलीला २ हजार रुपये देत तिने पळून जाण्यासाठी मदत केली. कसेबसे मुलीने तिचे घर गाठून घडलेली आपबिती घरच्यांना सांगितली. त्यानंतर मुलीच्या आई- वडिलांनी तिला घेऊन पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणातील दलालांचा पोलीस शोध घेत आहेत.