द काश्मीर फाइल्स... मोदी म्‍हणाले, सत्य दाबण्याचा प्रयत्‍न करू नका!; असे चित्रपट खूप कमी बनतात!!

 
मुंबई ः तथाकथित पुरोगाम्यांच्या नाकाला मिरच्या लावणाऱ्या द काश्मीर फाइल्स चित्रपटाचे सर्वस्तरातून स्वागत होत असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या चित्रपटाबद्दल गौरवोद्‌गार काढले आहेत. सोबतच त्‍यांनी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनाही सुनावले आहे. या लोकांची कमालच आहे, इतर वेळेस अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे झेंडे घेऊन मिरवतात आणि आता हेच अभिव्यक्‍ती स्वातंत्र्य त्‍यांना बोचतंय. ही पूर्ण जमात पाच- सहा दिवसांपासून खवळली आहे, असा टोला मोदींनी लगावला.

विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित या चित्रपटाचे सर्व जण कौतुक करताना दिसत आहेत. पंतप्रधान मोदींची नुकतीच चित्रपटाच्या टीमने भेट घेतली होती. आज भाजप संसदीय दलाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या चित्रपटावर चर्चा केली. निर्माता, दिग्दर्शकाने सत्य सादर करण्याचा प्रयत्न केला. पण त्या सत्याला न समजण्याची तयारी काही लोकांनी केली आहे. जगानेही हा चित्रपट पाहू नये म्‍हणून त्‍यांचे आकाडतांडव सुरू आहे. जे सत्य आहे ते समोर आणलं पाहिजे.

सत्याचे अनेक पैलू असू शकतात. हा चित्रपट योग्य नाही असं ज्यांना वाटतं त्यांनी दुसरा चित्रपट बनवावा, असा सल्लाही मोदींनी म्‍हटलं आहे. मोदींनी हा चित्रपट फारच उत्तम असल्याचे म्‍हटले आहे. अशाप्रकारचे आणखी चित्रपट निर्माण केले पाहिजेत, असेही ते म्‍हणाले. दरम्‍यान, सध्या प्रेक्षकांच्या वाढत्या मागणीनंतर हा चित्रपट देशभरात २ हजारांहून जास्त स्क्रीन्सवर दाखवला जात असल्याची माहिती समोर आली आहे. पाच राज्‍यांनी चित्रपट टॅक्‍स फ्री केला आहे.