Special Story : तिने शोधला यशाचा "पत्ता'!; कृतिका जैन सध्या बनलीये ७० लाख लोकांची वाटाडी!!; तिने काय केले, तुम्ही ही बातमी वाचूनच समजून घ्या...
२९ वर्षीय कृतिका म्हणाली, की तिचा जन्म इंदौरच्या मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शालेय शिक्षण आणि पदवीपर्यंतचे शिक्षण इंदौरमध्येच झाले. शाळेत असतानाच उच्च शिक्षण परदेशात घेण्याची खुणगाठ तिने मनाशी बांधली होती. परदेशात पदवीधर होण्यासाठी तिने घरच्यांकडे आग्रह धरला. परंतु घरच्यांनी तिचे ऐकले नाही. कारण ती लहान आहे असे पालकांना वाटत होते. मात्र जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशनची वेळी आली तेव्हा ती पुन्हा विदेशात शिक्षणासाठी आग्रह धरू लागली.
तिने स्वतः परदेशात जाण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तयार केली. तिने व्हिसा मिळवला आणि आवश्यक त्या सर्व परीक्षा उत्तीर्ण केल्या. त्यानंतर तिला अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठात प्रवेश मिळाला. येथून तिने मॅनेजमेंट टेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्सचे शिक्षण घेतले. प्रवेश मिळाल्यानंतर तिने जेव्हा वडिलांना सांगितले तेव्हा ते फारसे खुश नव्हते. मुलीची जात आहे तिला घरातच ठेवा. जर तुम्ही तिला बाहेर पाठवले तर काहीही होऊ शकते, असे आजूबाजूच्या लोकांनी त्यांना सांगितले होते.
बाबांना पटवणे कठीण होते. त्यामुळे मी माझ्या आईशी आणि आजी- आजोबांशी या विषयावर बोलले त्यांनी होकार दिला. मग माझ्या काही मित्रांना माझ्या वडिलांना पटवायला सांगितलं, असे कृतिका म्हणाली. मग वडिलांनी होकार दिला. मी तुमची मुलगी आहे. तुमचे नाव उज्ज्वल करूनच परत येईन, असा शब्द मी वडिलांना दिला असे ती सांगते. सर्व कागदपत्रांचे काम मी एकट्याने केले याचा त्यांना अभिमान वाटला, असे ती म्हणाली.
न्यूयॉर्कमध्ये गेल्यावर...
न्यूयॉर्कमध्ये दोन वर्षे शिक्षण घेतले. तेव्हा पुस्तकांव्यतिरिक्त न्यूयॉर्क समजून घेण्याचा प्रयत्न केला. स्थिर, मुक्त स्त्री बनणे काय असते याचा अनुभव तिथे घेता आला. परदेशात शिक्षण घेतल्यानंतर मी भारतात परतले तेव्हा आत्मविश्वासाने भारलेली होते. इथे आल्यावर लग्न झालं आणि मग मी कामाला सुरुवात केली, असे तिने सांगितले.
अशी झाली "पत्ता'ची सुरुवात...
न्यूयॉर्कमधील एखाद्याच्या घरी किंवा कार्यालयात पोहोचणे खूप सोपे आहे. कारण प्रत्येकाचा पत्ता गुगलवर चिन्हांकित केलेला असतो. कोविडच्या काळात भारतात ऑनलाइनचा ट्रेंड झपाट्याने वाढला. अशा परिस्थितीत डिलिव्हरी बॉयला स्वतःचा किंवा कोणाचा पत्ता समजावून सांगण्यासाठी जास्त वेळ लागत होता. भारतातील शहरे, परिसर, रस्ते असंघटित आहेत. माणूस त्या परिसरात पोहोचतो. मात्र शेवटी नेमक्या ठिकाणी पोहोचणे ही एका कठीण परीक्षा असते. दोन वर्षांत अमेरिकेत कोणाचा पत्ता शोधण्यासाठी अतिरिक्त कॅलरी जाळण्याची गरज वाटली नाही. परंतु आपल्या भारतात ही समस्या होती. यानंतर सहकारी रजत आणि मोहित जैन यांच्यासोबत मिळून काम सुरू केल्याचे ती सांगते.
कुटुंबाच्या पाठिंब्याने मुली चमत्कार करू शकतात...
कुटुंबाची साथ मिळाल्याने मी हे सर्व करू शकले. माझ्या पतीलासुद्धा माझ्या कामाचे आश्चर्य वाटते. कुटुंब एकत्र असेल तर घरातील सून आणि मुली अनेक चमत्कार घडवू शकतात, असे कृतिका सांगते.