Special CRIME STORY : क्रूरकर्मा मोहनकुमारची कहानी... एक, दोन नव्हे तब्‍बल २० तरुणींवर बलात्‍कार करून त्‍याने केला खून! तरुणींना असे जाळ्यात अडकवायचा...

 
बंगळुरू ः २५ ते ३० वर्षे वयाच्या अविवाहित तरुणींचा तो शोध घ्यायचा... त्यांच्याशी मैत्री करायची... प्रेमात पाडायचे... लग्नाचे वचन द्यायचे आणि नंतर स्वस्तातील एखाद्या लॉजमध्ये घेऊन जायचे आणि लैंगिक अत्‍याचार करायचा... एवढ्यावरच तो थांबत नव्हता. त्यानंतर तिला गर्भनिरोधक गोळीच्या नावाखाली विषारी पदार्थ खायला द्यायचा. नंतर काही क्षणांतच तिचा तडफडून मृत्यू व्हायचा... अंगावर शहारे आणणारी ही कहाणी आहे क्रूरकर्मा मोहनकुमार नावाच्या सिरियल किलरची... त्याने एक, दोन नव्हे तर तब्बल २० तरुणींवर बलात्कार करून, नंतर त्यांची हत्या केली. गर्भनिरोधक गोळीऐवजी तो तरुणींना दागिने चमकविण्यासाठी वापरण्यात येणारे सायनाइड द्यायचा. तब्बल ६ वर्षे हा प्रकार सुरू होता. मात्र या हत्याकांडाच्या मागे कोण आहे, हे पोलिसांना काही केल्या कळत नव्हते...

 

1232

वर्ष होते २००३... दक्षिण कर्नाटकातील एका शहरात महिलांच्या शौचालयासमोर प्रचंड गर्दी जमली होती. शौचालयाचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा का उघडला जात नाही हे कुणालाही समजत नव्हते. काही वेळानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शौचालयाचा दरवाजा तोडला आणि आतले दृश्य पाहून ते हादरून गेले.

आत ३० वर्षीय महिलेचा मृतदेह होता. पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र हत्या की आत्महत्या हे स्पष्ट होऊ शकले नाही. त्यानंतर काही दिवसांनी त्याच शहरातील आणखी एका टॉयलेटमध्ये एका तरुणीचा मृतदेह सापडला. आधीच्या घटनेत आणि या घटनेत बऱ्याच प्रमाणात साम्य होते. मात्र याहीवेळी पोलिसांना नेमके काय ते कळले नाही. त्यानंतर एकापाठोपाठ एक शौचालयांत तरुणीचे मृतदेह सापडण्याची मालिकाच सुरू झाली.

1232

२००९ पर्यंत कर्नाटकात तरुणी बेपत्ता होऊन त्‍यांचे मृतदेह शौचालयात सापडल्याच्या २० घटना समोर आल्या होत्या. या घटनांत साम्य असल्याने हे सर्व खून असावेत, असा दाट संशय पोलिसांना आता वाटू लागला होता. सर्व तरुणींचे मृतदेह कुठल्यातरी बसस्थानकाच्या शेजारी असलेल्या शौचालयात सापडत होते. सगळ्यांचे वय २५  ते ३० च्या दरम्यान होते. ज्या तरुणींची हत्या झाली त्या सर्वांनी चांगली साडी नेसली होती. मात्र दागिने एकीच्याही अंगावर नव्हते. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

अनेक फोन कॉल तपासले तेव्हा हत्या झालेल्या प्रत्येक तरुणीचे कनेक्शन मंगलौर गावाशी असल्याचे समोर आले. प्रत्येकीला या गावातून फोन केला गेला होता. त्यामुळे गावातील एखादी लुटमार करणारी टोळी किंवा सेक्स रॅकेट टोळी या हत्याकांडामागे सक्रिय असावी, असे पोलिसांना वाटू लागले.

लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध...
या घटनेचा तपास युद्धपातळीवर पोलिसांनी हाती घेतला. मृतदेह सापडलेल्या एका तरुणीच्या मोबाइलवर तिचा नातेवाइक मोहन कुमार याचा कॉल वारंवार आल्याचे दिसले. मोहनकुमारला मंगलौरजवळील डरलाकट्टा गावातून पोलिसांनी ताब्यात घेतले.

त्याच्या चौकशीत जे सत्य समोर आले ते ऐकून पोलीस चक्रावून गेले. चौकशीत मोहन कुमारने सांगितले, की तो लग्न न झालेल्या गरीब मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा. त्यांच्यासोबत प्रेमाच्या आणि सोबत जगण्या- मरणाच्या आणाभाका घ्यायचा. लग्नाचा विषय निघाल्यानंतर आपण पळून जाऊन लग्न करू, असे तो तिला म्हणायचा. त्यानंतर लग्नासाठी घरातून साडी आणि दागिने घेऊन यायला सांगत होता.

बिचारी तरुणी लग्नाच्या अामिषाला बळी पडायची आणि त्याच्यासोबत पळून जायला तयार व्हायची. दोघेही एका स्वस्तातील हॉटेलमध्ये मुक्काम करायचे. उद्या सकाळी लग्न करू, असे तो तिला सांगायचा. त्‍या रात्री तो तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवायचा.

दुसऱ्या दिवशी सकाळी दोघेही लग्नासाठी तयार व्हायचे. तरुणी त्याच हॉटेलमध्ये श्रृंगार करायची. अंगावर चांगली साडी नेसायची. त्यानंतर तो काम असल्याचे सांगत तिच्याआधी लॉजबाहेर पडायचा आणि तिला बसस्टँडवर भेटू आणि तिथून मंदिरात जाऊ, असे सांगायचा. नवरीसारखी तयार झालेली तरुणी बसस्टँडवर यायची. त्याच वेळी खिशातून तो गोळी काढायचा. रात्री जे झाले त्याची चिंता करू नको. टॉयलेटमध्ये जा आणि ही गर्भनिरोधक गोळी घे, असे तो तिला म्हणायचा.

टॉयलेटमध्ये दागिन्यांचे काय काम, असे म्हणत तो तिच्या अंगावरील दागिने काढून तिच्या बॅगमध्ये टाकायचा. ती टॉयलेटमध्ये गेल्यानंतर तो तिची बॅग घेऊन बस स्टँडमध्ये थांबत होता. ती टॉयलेटमध्ये गेल्यानंतर गोळी घ्यायची आणि पुढच्या काही क्षणांत ती टॉयलेटमध्येच दम तोडायची. तिथे जोपर्यंत गर्दी जमत नाही आणि ती मेल्याची खात्री होत नाही तोपर्यंत तो तिथेच थांबत होता. ती मेल्याची खात्री होताच तो लॉजमध्ये जायचा. रात्री तिच्यासोबत असल्याचे सर्व पुरावे नष्ट करायचा आणि पुन्हा दुसरीला जाळ्यात अडकवण्याचा त्याचा उद्योग सुरू व्हायचा.