लग्नाचे आमिष दाखवून प्रेयसीवर दीड वर्षे लैंगिक अत्‍याचार

 
लखनौ ः लग्नाचे आमिष दाखवून दीड वर्षे तरुणीवर लैंगिक अत्‍याचार केल्यानंतर घरचे नकार देतील, मान्य करणार नाहीत असे म्‍हणून तिला सोडून दिले. फसवले गेल्याची जाणीव झाल्यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली. त्‍यावरून पोलिसांनी युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही धक्कादायक घटना उत्तरप्रदेशातील लखनौमध्ये समोर आली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित तरुणी एका इन्स्टिट्यूटमध्ये शिकत होती. या ठिकाणी तिची ओळख युवकासोबत झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यादरम्‍यान त्‍याने तिच्यासोबत लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केले. दीड वर्षे तो तिचे शोषण करत राहिला. तिने लग्नाचा हट्टच धरल्याने आणि त्या शिवाय शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने त्‍याने तिला मंदिरात नेले आणि कपाळाला कुंकू लावून खोटे लग्न केले.

त्‍यानंतर नातेवाइकांना सांगून धूमधडाक्‍यात लग्न करू, असे आश्वासन दिले. यादरम्‍यान त्याने तिच्याकडून अनेकदा पैसेही घेतले. कधी १० हजार कधी ३० हजार असे पैसे त्‍याने उकळले. कालांतराने मन भरल्याने तिला टाळू लागला. तिने याबद्दल विचारले असता कुटुंबाच्या विरोधात जाऊन लग्न करू शकत नाही, असे तो म्‍हणाला. त्‍यामुळे तिने पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून युवकाला ताब्‍यात घेतले आहे.