National news धक्कादायक ! बेपत्ता मुलीचा शोध घेणाऱ्या आईवर तिघांचा सामूहिक बलात्कार; तिघेही पंचतारांकित हॉटेलमध्ये वेटर
Apr 16, 2022, 10:09 IST
नवी दिल्ली: बेपत्ता मुलीचा शोध घेणाऱ्या मुलीच्या ३६ वर्षीय आईवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना नवी दिल्लीत समोर आली आहे. मुलीच्या आईने शुक्रवारी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून बलात्कार करणाऱ्या तिघांना जेरबंद केले आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार ३६ वर्षीय महिला पश्चिम दिल्लीतील पंजाबी बाग भागात राहते. महिलेची १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी काही दिवसांपासून बेपत्ता होती. मुलीचा शोध घेत असतांना एकाने तिला मदत करण्याचे आमिष दाखविले. तो महिलेला त्याने भाड्याने घेतलेल्या खोलीवर घेऊन गेला.
त्यानंतर महिलेला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजले आणि त्याने आणि त्याच्या दोन साथीदारांनी महिलेवर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. शुद्धीत आल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात जाऊन आपबिती कथन केली. तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी नवीन सिंह (२८), विश्व मोहन आचार्य (२६) आणि अक्षय तनेजा (३०) या तिघांना अटक केली आहे. तिघेही दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेल मध्ये वेटर असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.