NATIONAL NEWS उद्या गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल! भाजप सत्ता राखणार की काँग्रेस करिश्मा दाखवणार? ..एक्झीट पोलचा कल भाजपच्या बाजूने..!

 
मुंबई( लाइव्ह ग्रुप नेटवर्क): गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या म्हणजेच ८ डिसेंबरला जाहीर होणार आहे. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यात मतदान झाले होते. यावेळी भाजपा ,काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने गुजरात निवडणुकीत जोर लावला होता. भाजपच्या वतीने स्वतः  पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी प्रचाराची धुरा सांभाळली तर काँग्रेसकडून अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांनी हजेरी लावली. राहुल गांधीनी सुद्धा भारत जोडो यात्रेतून एका दिवसाचा ब्रेक घेत दोन सभा घेतल्या होत्या तर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल यांनी सुद्धा प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. त्यामुळे आता गुजरात कुणाच्या ताब्यात जाणार हे उद्या ८ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे.

गेल्या २७ वर्षांपासून गुजरात एकहाती भाजपच्या ताब्यात आहे. १८२ जागा असलेल्या गुजरात विधानसभेची निवडणूक दोन टप्प्यात पार पडली होती. १ डिसेंबरला ८९ तर उर्वरित जागांसाठी ५ डिसेंबरला मतदान पार पडले. दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर समोर आलेल्या एक्झीट पोलनुसार यावेळेसही गुजरात भाजपच्याच ताब्यात जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. भाजपला १२८ ते १४० तर काँग्रेसला ३१ ते ४३ जागा तर आम आदमी पार्टीला ३ ते ११ जागा मिळतील असा अंदाज एबीपी - सी वोटर च्या एक्झीट पोल ने वर्तविला आहे. अर्थात खर काय हे उद्या ८ डिसेंबरला सकाळी ७ वाजेपासून सुरू होणाऱ्या मतमोजणी नंतर कळणार आहे.