मोदी सरकारचे मिशन गंगा सुरू... पाचवे विमान मायदेशी!; युक्रेनमधील विद्यार्थ्यांना सुरक्षित आणले!
युद्धाला चार दिवस होत आले असून, युक्रेनचे सैन्य रशियाच्या सैन्याशी चिवटपणे सामना करत आहे. त्यामुळे रशियाचे सैन्य वैतागले अाहे. आता तर बेलारूसचे सैन्यही रशियाला साथ देत युद्धात उतरणार असल्याने एकाचवेळी युक्रेनला दोन देशांची लढावे लागणार आहे. दुसरीकडे युक्रेनच्या बाजूने मात्र अद्याप कुणीही उभे राहिलेले नाही. युक्रेनच्या शहरांमध्ये घुसलेले रशियन सैनिक लुटालुटीवर उतरले असून, आतापर्यंत ३.८६ लाख नागरिकांनी युक्रेन सोडून इतर देशांत आश्रय घेतल्याची माहिती संयुक्त राष्ट्राकडून देण्यात आली आहे.
भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारतीयांना कोणतेही न करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानंतर तशा सूचनाही सैन्याला देण्यात आल्या. भारताचा झेंडा लावलेल्या गाड्याही सुरक्षित अनेक ठिकाणावरून बाहेर पडल्या. मात्र रोमानिया आणि पोलंड सीमेवर या गाड्या पोहोचल्यानंतर भारतीय विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या.
पंजाबमधील एका विद्यार्थ्याने मारहाणीचा व्हिडिओ शेअर केला असून, त्यात युक्रेनच्या पोलिसांनी बॅग घेऊन जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना लाथा मारल्याचे दिसत आहे. पोलंड सीमेवरही युक्रेनच्या पोलिसांनी मारहाण केल्याचे छत्तीसगडच्या एका विद्यार्थ्याने सांगितले. दरम्यान, पुतीन यांनी अण्वस्त्रसज्ज युनिटला हाय अलर्टवर ठेवल्याने रशिया कोणत्याही क्षणी युक्रेनवर अण्वस्त्र हल्ला चढवू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.