पोलिसाचा गणवेश घालून तरुणींना द्यायचा लिफ्ट... जंगलात नेऊन करायचा लैंगिक अत्‍याचार!, ६ तरुणींसोबत केले दुष्कृत्‍य, पण एकीमुळे फुटला पापाचा घडा!!

 
फरीदाबाद (हरियाणा) : पोलिसाचा गणवेश घालून टॅक्‍सीचालक मुलींना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवायचा. नंतर निर्जनस्थळी घेऊन जात त्यांच्यावर बलात्कार करायचा. फरिदाबादच्या गुन्हे शाखेने नराधमाच्या मुसक्या आवळल्या आहेत. एका मुलीला सूरजकुंडच्या जंगलात नेऊन बलात्काराचा प्रयत्‍न केल्यानंतर त्‍याचा कारनामा समोर आला. अटकेनंतर त्याने ६ महिलांना लिफ्ट देऊन अशाच प्रकारे बलात्कार केल्याचे समोर आले. गुन्ह्यात वापरलेली कार, बनावट ओळखपत्र आणि यूपी पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आला आहे.

678

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० जानेवारी रोजी फरिदाबादमधील एक तरुणी सूरजकुंड चौकाजवळ उभी होती. तेव्हा दुर्गा विहार लकडापूर येथील रहिवासी विनयकुमार राठीने त्याची कार तिथे थांबवली. त्याने तरुणीला पोलिसाचे आयकार्ड दाखवून कारमध्ये लिफ्ट देत असल्याचे सांगितले. या परिसरात तोडफोड सुरू आहे. इथे कोणतीही घटना घडू शकते. त्यामुळे पोलीस ठाण्यात गेल्यानंतर कुटुंबियांना बोलावून त्यांच्या ताब्यात देतो, असे त्याने तिला सांगितले. तरुणी कारमध्ये बसल्यानंतर त्याने धमकावून तिला सूरजकुंडच्या जंगलात नेले आणि कार लॉक केली. त्यानंतर त्याने तरुणीला शारीरिक संबंध ठेवू दे, अशी मागणी केली.

तिने नकार दिल्याने त्याने जबरदस्ती बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिने आरडाओरड केल्याने तिला कारमधून बाहेर काढून त्याने पळ काढला. घटनेनंतर तरुणी प्रचंड घाबरली होती त्यामुळे तब्बल २६ दिवसांनी २५ फेब्रुवारी रोजी तिने  पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने २७ फेब्रुवारी रोजी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करून त्याची कारागृहात रवानगी केली.

९ मार्च रोजी न्यायालयासमोर आरोपीची ओळख परेड पार पडली. चोर बाजारातून त्याने पोलिसाचा गणवेश खरेदी केल्याचे चौकशीत समोर आले आहे. एका पोलिसाचे ओळखपत्र त्याच्या गाडीत राहिल्याचे त्याने सांगितले. त्याला पाहताच फेक आयडी बनवण्याची कल्पना त्याला सुचली. आतापर्यंत त्याने ६ तरुणींवर बलात्कार केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या तरुणींना तक्रार करण्याची विनंती पोलिसांनी केली आहे.