भाजपच्या जाहीरनाम्यात मुलींना स्कुटी देणार अन्‌ लव्ह जिहादवर ही राहणार कडक शिक्षा!

 
लखनौ ः उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान १० फेब्रुवारीला होत आहे. यामुळे राजकीय पक्षांनी आपापले जाहीरनामे सादर केले असून, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपाने आपला उत्तर प्रदेशसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. लोककल्याण संकल्प पत्र असे नाव त्‍याला दिले आहे.
लव्ह जिहादप्रकरणात १ लाख रुपये दंड आणि कमीत-कमी १० वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. महाविद्यालयीन विद्यार्थिनींना स्कुटी आणि विद्यार्थ्यांना लॅपटॉप देणार असल्याचेही म्‍हटले आहे. युवकांसाठी प्रत्येक ब्लॉकमध्ये आयटीआय स्थापन करणार, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना होळी आणि दीपावलीच्या दिवशी दोन मोफत एलपीजी सिलिंडर देणार, ६० वर्षांवरील महिलांसाठी सार्वजनिक वाहतुकीत मोफत प्रवास, विधवा- निराधार महिलांसाठी निवृत्ती वेतन दरमहा दीड हजार रुपये करणार, शेतकऱ्यांना मोफत वीज अशी आश्वासनेही दिली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष सुरेश खन्‍ना हे जाहीरनामा प्रसिद्ध करताना उपस्थित होते. दरम्‍यान, उत्तरप्रदेशातील पहिल्या टप्प्यातील प्रचार आज सायंकाळी संपणार असून, १० फेब्रुवारीला शामली, मेरठ, मुझफ्फरनगर, बागपत, हापूर, गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंदशहर, मथुरा, आग्रा आणि अलीगढमधील ५८ जागांसाठी मतदान होणार आहे. १०, १४, २०, २३, २७ फेब्रुवारीसह ३ आणि ७ मार्च रोजी सात टप्प्यांत मतदान होणार आहे. १० मार्चला मतमोजणी होणार आहे.