५ फूट २ इंच उंची, जाड्या ६७ वर्षीय म्हाताऱ्याने ६० महिलांना आकर्षित कसे केले असेल?; २७ लग्नं, ६० महिलांची फसवणूक
बिभू प्रकाश स्वेन (६७) असे या भामट्याचे नाव. दिसायला म्हाताराच. मात्र त्याच्या कारनाम्यांनी अनेकांना हैराण करून सोडलेय. आधी वैद्यकीय प्रयोगशाळेत सहायक म्हणून तो काम करत होता. मात्र मॅट्रिमोनिअल साईट्सवर तो स्वत:ला कधी डॉक्टर, कधी प्रोफेसर तर कधी वरिष्ठ सरकारी अधिकारी असल्याचे सांगत सतत लग्ने करून महिलांना फसवत होता. ८ महिन्यांपासून पोलीस त्याचा शोध घेत होते. त्याचे पहिले लग्न १९७८ मध्ये झाले होते. त्याला तीन मुलेही आहेत. त्यापैकी दोन डॉक्टर आणि एक डेंटिस्ट आहे. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर बिभूने एकापाठोपाठ एक लग्न करून भुवनेश्वरमध्ये एकटे राहण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने लग्न करण्याचा सपाटाच लावला.
भुवनेश्वरमध्ये आहेत तीन फ्लॅट, तिन्हींमध्ये राहत होत्या बायका...
पोलिसांच्या तपासात बिभूबद्दल एकापेक्षा एक धक्कादायक खुलासे होत आहेत. त्याने भुवनेश्वरमध्ये तीन फ्लॅट घेतले होते. त्यात एकाच वेळी तिन्ही बायका वेगवेगळ्या ठिकाणी राहत होत्या. याशिवाय इतर शहरांतही त्याचा अधूनमधून लग्नाचा कार्यक्रम ठरलेला असायचा, अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. अनेक महिलांची फसवणूक करणारा बिभू अतिशय हुशार होता. बायको एक, बायको दोन, शिक्षिका बायको, भावी बायको, अशा नावाने तो पीडित बायकांचे नंबर फोनमध्ये सेव्ह करत होता. पोलिसांनी त्याचा फोन तपासला तेव्हा अशा अनेक महिलांचे नंबरही सापडले, ज्यांच्याशी तो काही दिवसांत लग्न करणार होता.
अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांना करत होता लक्ष्य
बिभू अविवाहित, विधवा आणि घटस्फोटित महिलांचा वेगवेगळ्या विवाहस्थळांवर शोध घेत होता. ४० ते ५० या वयोगटातील महिलांना तो लक्ष्य करत होता. मॅट्रिमोनिअल साईटवर तो त्याचे वय ६७ ऐवजी ५६ असल्याचे सांगत होता. लग्नानंतर तो काही दिवस पत्नीसोबत राहायचा आणि त्यानंतर पैसे आणि दागिने लुटून फरार व्हायचा.
प्रशासकीय अधिकारी, सर्वोच्च न्यायालयाच्या वकिलांचीही फसवणूक...
म्हाताऱ्याच्या फसवणुकीला बळी पडलेल्या बहुतांश महिला या सुशिक्षित आणि चांगल्या पदावर कार्यरत आहेत. यामध्ये केरळ लोकसेवा आयोगाच्या अधिकारी, ITBP च्या अधिकारी, सर्वोच्च न्यायालयातील दोन वकील, दिल्लीतील शिक्षिका आणि उच्च सरकारी नोकऱ्या असलेल्या महिलांचा समावेश आहे. दिल्लीतील शिक्षक महिलेच्या तक्रारीनंतर हा सर्व प्रकार समोर आला.
बँकांनाही फसवले...
बिभू इतर मार्गानेही फसवणूक करायचा. १२८ बनावट क्रेडिट कार्डच्या माध्यमातून त्याने १३ बँकांची एक कोटी रुपयांनी फसवणूक केली. केरळमधील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने अनेक विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांकडून कोट्यवधी रुपये उकळले होते. या प्रकरणात तो तुरुंगातही गेला होता.