नोकरीच्या आमिषाने बोलावून तरुणीवर चौघांचा सामूहिक बलात्‍कार; अंगावर शहारे आणणारी घटना

 
चुरू : सामूहिक बलात्‍काराच्या घटनेने पुन्हा एकदा हादरले आहे. चुरू जिल्ह्यात ही घटना समोर आली आहे. चार नराधमांनी तरुणीला नोकरी देण्याच्या आमिषाने दिल्लीवरून चुरू येथे बोलावले. हॉटेलमध्ये तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर तिला दुसऱ्या मजल्यावरून फेकले. सुदैवाने तिच्या हातांना बांधलेली दोरी विजेच्या खांबाला अडकल्याने तिचा जीव वाचला. तब्बल दोन तास ती अडकून होती. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तिची सुटका केली.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पीडित २५ वर्षीय तरुणी मूळची आसाम राज्यातील असून, सध्या ती दिल्लीत राहते. चुरू येथील सुनील उर्फ राजू याने तिला नोकरी देण्याचे आमिष दाखवून चुरू येथे बोलावले. तरुणी पोहोचल्यावर तिला एका हॉटेलमधील रूमवर नेण्यात आले. तिथे सुनीलचे आणखी तीन सहकारी पोहोचले. चौघांनी दारूच्या नशेत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. त्यानंतर तिला दोरीने बांधून दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकले.

सुदैवाने तिच्या हाताला बांधलेली दोरी एका विजेच्या खांबात अडकल्याने ती तशीच अडकून पडली. तब्बल दोन तास ती अडकून पडलेली होती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणीची सुटका केली आणि तिला रुग्णालयात दाखल केले. पीडित तरुणीने दिलेल्या जबाबावरून पोलिसांनी चुरू येथील सुनील उर्फ राजू, विक्रम सिंग, भवानी सिंग आणि देवेंद्र सिंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपींपैकी भवानी सिंह हा एका सरकारी शाळेत शिक्षक आहे. सध्या चारही आरोपी फरारी असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.