BULDANA LIVE EXCLUSIVE चिंताजनक! एकाच दिवसात ८६ आया - बहिणींवर होतात बलात्कार! महिलांवरील अत्याचाराचे तासाला दाखल होतात ४९ गुन्हे! स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात हे चाललय तरी काय?

 
बुलडाणा( अनंता काशीकर:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): भारताला स्वातंत्र्य होऊन ७५ वर्षे झालीत..स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव देशभरात धूमधडाक्यात साजरा करण्यात येत आहे. मात्र स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू असताना देशभरात आया - बहिणीवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्याचे समोर आले आहे. देशभरात एका दिवसाला ८६ आया - बहिणींवर बलात्कार होत असून दर तासाला महिलांवरील अत्याचाराचे ४९ गुन्हे दाखल होत असल्याचे चिंताजनक वास्तव समोर आले आहे. राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभागाच्या अहवालावरून ही आकडेवारी समोर आली आहे.

 गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभागाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार २०२० या वर्षात देशभरात २८०४६ इतक्या बलात्काराच्या घटना घडल्या होत्या. त्यात २०२१ या वर्षात मोठी वाढ झाली. २०२१ मध्ये  बलात्काराच्या ३२ हजार ३३ घटना उघडकीस आल्या.
  
बलात्कारांच्या घटनांत माझा महाराष्ट्र मागे नाही..!
  
देशभरात आया बहिणीची अब्रू चव्हाट्यावर टांगली जात असताना या घटनांमध्ये महाराष्ट्र सुद्धा मागे नसल्याचे वास्तव आहे. परस्री मातेसमान अशी शिकवण देणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या आणि संताच्या महाराष्ट्रात २०२१ या वर्षात २ हजार ४९६ आया - बहिणीवर बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. राजस्थानात सर्वाधिक ६ हजार ३३७, मध्यप्रदेशात २ हजार ९४७, उत्तर प्रदेशात २ हजार ८४५ तर देशाची राजधानी दिल्लीत १ हजार २५० बलात्कारांच्या घटनांची नोंद आहे.
 
 दर दिवसाला ८६ आया बहिणींची इज्जत धोक्यात..!

राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभागाच्या अहवालानुसार दररोज सरासरी ८६ बलात्काराच्या घटना घडतात. तर प्रती तासाला महिलांवरील अत्याचाराचे ४९ गुन्हे दाखल होतात. त्यात विनयभंग, हुंड्यासाठी छळ, मारहाण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. वर्षभरात महिलांवर होणाऱ्या विविध अत्याचाराचे ४ लाख २८ हजार २७८ गुन्हे दाखल झाले आहेत.