काश्मिरी पंडितांवरील अत्याचार : शरद पवार म्हणाले , झालं गेलं विसरून गेलं पाहिजे..!

 
नवी दिल्ली : देशभरात सध्या द काश्मीर फाईल्स या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. केवळ १४ कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट कमाईचे सर्वच रेकॉर्ड मोडण्याच्या तयारीत आहे. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा चित्रपट पाहण्याचे देशवासीयांना आवाहन केले होते. त्यामुळे काँग्रेससह विरोधी पक्षांचा गट  चित्रपटावर सातत्याने टीकेची झोड उठवत आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुद्धा चित्रपटावर भाष्य केले आहे.

चित्रपटामुळे देशातील एक विचार मारला जात आहे. देशातील बंधूप्रेम संपवलं जात आहे, असे पवारांनी म्हटले आहे. दिल्लीत आयोजित राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार यांनी हे विधान केले. संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्षपद शरद पवारांकडे देण्यात यावे, असा प्रस्ताव मेळाव्यात मांडण्यात आला.

काश्मिरमध्ये जे काही तेव्हा झालं तेव्हा पंतप्रधान व्ही. पी. सिंग आणि गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद होते. सरकारला भाजपचा पाठिंबा होता. तेव्हा काश्मीरचे राज्यपाल कोण होते हे सांगायची गरज नाही. त्याची जबाबदारी तेच घेऊ शकतात. जे काही झालं ते देशासाठी चांगलं झालं नाही. मात्र झालं गेलं विसरून समाजात एकता कशी राहील हे पाहिले पाहिजे, असं पवार म्हणाले.

पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असोत मात्र त्यांनी देश एक ठेवणं महत्त्वाचं असतं. मात्र स्वतः पंतप्रधान चित्रपट चांगला आहे असं म्हणतात. महाराष्ट्र विधासभेत अधिवेशन सुरू असताना दुपारी भाजपचा एकही आमदार सभागृहात नव्हता. सगळे चित्रपट पहायला गेले होते. अशाने देशात एकता राहणार नाही. धर्मनिरपेक्षतेवर भाजपचा विश्वास नाही. काश्मिरी पंडितांवर झालेले हल्ले काँग्रेस आणि अल्पसंख्याकांनी केले हे दाखवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, असेही शरद पवार म्हणाले.