कोरोनातून बरे होण्यासाठी ८ कोटींचा केला खर्च! ५० एकर जमीन विकली... तरीही नाही वाचला जीव!!
मध्यप्रदेशातल्या रीवा जिल्ह्यातील धर्मराज सिंह या प्रगतिशील शेतकऱ्याला आठ महिन्यांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना रीवा येथील संजय गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथे १८ दिवस त्यांच्यावर उपचार करण्यात आले. उपचारादरम्यान फुफ्फुसात जास्त संसर्ग झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना एअर ॲम्बुलन्सने चेन्नईतील अपोलो रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं. धर्मराज यांच्यावर तब्बल आठ महिने उपचार सुरू होते.
मात्र तरीही जीवन मरणाची लढाई त्यांना जिंकता आली नाही. उपचारासाठी त्यांच्या कुटुंबाचा तब्बल आठ कोटी रुपयांचा खर्च झाला. धर्मराज सिंह यांच्या फुफ्फुसांना १०० टक्के संसर्ग झाला होता. अपोलो रुग्णालयात देशातील नामवंत डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले .लंडनमधील डॉक्टरांनी सुद्धा धर्मराज सिंह यांच्यावर उपचार केले. मात्र अखेर रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धर्मराज सिंह यांची मध्य प्रदेशातील प्रगतशील शेतकऱ्यांमध्ये गणना होते. धर्मराज सिंह यांची संपूर्ण राज्यात स्वतःची वेगळी ओळख होती.
स्ट्रॉबेरी आणि गुलाबाची लागवड करून त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. २६ जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीसुद्धा धर्मराज सिंह यांचा सन्मान केला होता. अपोलो रुग्णालयात इक्मो मशिनच्या सहाय्याने त्यांना नवजीवन देण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यातच ब्रेन हॅमरेजमुळे त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. ८ महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. इक्मो मशिनसाठी रोज तीन ते चार लाख रुपयांचा खर्च येत होता. व्हेंटिलेटर निकामी झाल्यानंतर इक्मो मशिनची आवश्यकता भासते. उपचारासाठी धर्मराज सिंह यांच्या कुटुंबीयांनी ५० एकर जमीन विकली. उपचारासाठी सरकारकडून ४ लाख रुपयांची मदत मिळाली. मात्र तो केवळ एकाच दिवसाचा खर्च होता. कोरोनाच्या काळात धर्मराज सिंह यांनी नागरिकांची खूप सेवा केली. या दरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला, असे धर्मराज सिंह यांच्या भावाने सांगितले.