ही छळकहानी वाचून तुम्‍ही हादरून जाल... पण जळगाव जामोदच्या लेकीने हे सर्व केलेय सहन!

 
विवाहितेचा छळ
जळगाव जामाेद (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः लग्न झाले, मूल होऊन ते दीड वर्षाचेही झाले... पण हुंड्याचे बाकी राहिलेले ५० हजार रुपये काही सासरचे मंडळी विसरले नाहीत. तिचा लग्न झाल्यापासून छळ मांडला असून, अखेर गेल्या महिन्यात तिला नेसत्या वस्‍त्रानिशी घरातून हाकलून लावले. जळगाव जामोद तालुक्‍यातील पिंपळगाव काळे येथील माहेरी असलेल्या सौ.गौरी वैष्णव बोंबटकार या ३२ वर्षीय विवाहितेने अखेर पोलिसांत धाव घेऊन पतीसह सासरच्या मंडळीविरुद्ध तक्रार दिली.

पती वैष्णव ज्ञानदेव बोंबटकार (२९), सासू वंदना ज्ञानदेव बोंबटकार (५०), दीर शुभम ज्ञानदेव बोंबटकार (२०), सासरा भागवत बोंबटकार (६५), उमेश भागवत बोंबटकार (३२, सर्व रा. तालखेड पो.कुऱ्हा काकोडा, ता. मुक्ताईनगर, जि.जळगाव खानदेश) अशी जळगाव जामोद पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत.

तक्रारीनुसार, गौरीचे लग्न वैष्णवसोबत १९ फेब्रुवारी २०१८ रोजी झाले होते. लग्नात तिच्या वडिलांनी ५० हजार रुपये हुंडा दिला होता व संसारोपयोगी साहित्य दिले होते. तीन महिने सासरच्यांनी तिला चांगले वागवले. नंतर मात्र चारित्र्यावर संशय घेऊन तिचा छळ सुरू झाला. सासूकडून अश्लील शिविगाळ केली जायची. तिचा पती लाथाबुक्‍क्यांनी, कधी कंबरेच्या पट्ट्याने बेदम मारहाण करत होता. मारझोडीत तिच्या हाताचे मनगटाचे हाड मोडले आहे. भावी आयुष्याचा विचार करून ती हा त्रास सहन करत होती.

तिला मुलगा झाला. तरीही सासरच्या लोकांच्या वागणुकीत फरक पडला नाही. हुंड्याचे उरलेले ५० हजार रुपये अजून तुझ्या वडिलांनी दिले नाहीत असे म्‍हणून सासू छळ करत होती. दीर आणि सासू अनैतिक संबंधाचे आरोप करत होते. हुंड्याचे पैसे आणत नाहीत तोपर्यंत घरात पाय टाकू नको, असे म्हणून गौरीला मारझोड करून नेसत्या वस्त्रानिशी घराबाहेर हाकलून देण्यात आले. ती माहेरी आली. तिच्या आई-वडिलांसोबत येऊन तिने जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली.