होय! सिंदखेडराजा तालुक्यातील जागदरीचे रामभाऊ कठाळे मृत्यूनंतरही 'जिवंत' आहेत!..

 
सिंदखेडराजा (बाळासाहेब भोसले: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) बातमीचे हेडिंग वाचून तुम्ही चक्रावले असाल! पण होय सिंदखेडराजा तालुक्यातील जागदरी येथील ८३ वर्षीय रामभाऊ कठाळे मृत्यूनंतर ही जिवंत आहेत. 'मरावे परी कीर्ती रुपये उरावे'..अर्थात मेल्यानंतरही जिवंत रहावे! इतके महान कार्य करून जीवन यात्रा संपवली पाहिजे.असा एकंदरीत या ओळींचा परोपकारी संदेश आहे.. रामभाऊ कठाळे यांचे २८ जून रोजी छत्रपती संभाजीनगर येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यानंतर कठाळे कुटुंबीयांनी मृतक रामभाऊ यांचे देहदान करण्याचा निर्णय घेतला. यामुळेच रामभाऊ कठाळे हे मेल्यानंतर देखील जिवंत आहेत.. असा प्रत्यय समोर येतो. या निर्णयाने कठाळे कुटुंबीयांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. 
    रामभाऊ तुळशीराम कठाळे यांच्या दीर्घ आजारावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयातयात उपचार सुरू होते. दरम्यान शुक्रवारी त्यांची प्राणज्योत मालवली. कठाळे कुटुंबातील सर्वजण उच्चशिक्षित सोबतच सुधारणवादी व पुरोगामी विचारसरणीचे आहेत. कठाळे कुटुंबीयांनी यांनी रामभाऊ कठाळे यांना अंतिम निरोप देताना सर्वच कर्मकांडाला बगल देत त्यांचे पार्थिव छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालय घाटी येथे दान केले. त्यानंतर रविवारी ३० जूनला श्रद्धांजलीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी जागदरी गावात समाजातील गणमान्य उपस्थित होते. उपस्थित सर्वांनीच कठाळे कुटुंबीयांच्या निर्णयाचे स्वागत केले होते. या कुटुंबीयांचा आदर्श समाजातील प्रत्येक घटकांनी घ्यावा असे आवाहनही करण्यात आले. मृतक रामभाऊ कठाळे यांच्या पश्चात चार मुले, दोन मुली, दहा नातू, चार पणतू असा बराच मोठा आप्तपरिवार आहे. कटाळे कुटुंबीयाचे मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यात सर्वत्र कौतुक केले जात आहे.