खड्डेमय रस्त्याने घेतला महिलेचा बळी!; दुचाकीवरून पडून मृत्‍यू

सिंदखेड राजा तालुक्‍यातील घटना
 
file photo
सिंदखेड राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मलकापूर पांगरा ते दुसरबीड या खड्डेमय रस्त्याने एका महिलेचा बळी घेतला आहे. खड्ड्यात दुचाकी आदळून अनियंत्रित झाल्याने ४५ वर्षीय महिला गाडीवरून पडली आणि डोक्‍याला मार लागून त्‍यांचा मृत्‍यू झाला. ही घटना २९ डिसेंबरला दुपारी घडली.

सौ. सविता उद्धव देशमुख (४५, रा. मलकापूर पांगरा, ता. सिंदखेड राजा) असे मृत्‍यू झालेल्या महिलेचे नाव आहे. उद्धव देशमुख पत्नी व वडिलांसह शेतात जात होते. मलकापूर पांगरा- दुसरबीड रोड खड्डेमय असल्याने एका खड्ड्यात दुचाकी आदळून नियंत्रण हुकले. त्‍यामुळे सौ. सविता या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला मार लागला. त्यांना प्राथमिक उपचारासाठी दुसरबीड येथील डॉ. शिंदे यांच्या हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.

तिथून जालन्याला हलविण्यात आले. जालन्याच्या डॉक्‍टरांनी प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने औरंगाबादला नेण्यास सांगितले. मात्र औरंगाबादला नेत असताना मध्येच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, सासरे, तीन मुली व एक मुलगा आहे. मलकापूर पांगरा- दुसरबीड रस्स्त्यावर समृद्धी महामार्गावरील वाहनांमुळे मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या अवजड वाहनांवरील चालक अनेकदा नशेतच वाहने चालवत असतात. त्‍यामुळे छोट्या वाहनांवर जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागते. रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.