अटकपूर्व जामीन घेऊन अंढेरा पोलीस ठाण्यात ऐटीत आला पण "मोठा गेम" झाला; पळायचा प्रयत्न केला पुन्हा दोन तासात पकडला; डिग्रसचा दुसरा वाघही जेरबंद; येरवड्यात पाठवला...

 

चिखली(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): त्याला पुढे काय होणार माहीतच नव्हत...एका प्रकरणात अटकपूर्व जामीन घेतल्यानंतर आपल्या अंगाला पोलीस धक्काही लावणार नाहीत, मी कुणाच्या बापाला भितो या अविर्भावात तो अंढेरा पोलीस ठाण्यात आला..कोर्टाची ऑर्डर घेऊन तो पोलीस ठाण्यात आला खरा पण आपल्या पुढ्यात काय ओढवून ठेवलंय याची कल्पना त्याला नव्हती..तिथे गेल्यावर आपल्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याची कुणकुण त्याला लागली, नावात जरी वाघ असला तरी कारवाईची कुणकुण लागताच तो ठाण्यातून सुसाट बाहेर पळाला..तो पुढे अन् पोलीस मागे... जालन्यातून रेल्वेने मुंबईत फरार होण्याचा त्याचा प्लॅन होता..पण फसला, अंढेरा आणि जालना पोलिसांनी संयुक्त कारवाई करीत त्याला जालनाच्या रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले..आता त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली असून तब्बल वर्षभर डीग्रसचा माऊली वाघ आता या जेलमध्ये राहणार आहे..

अवैध रेती वाहतूक आणि उत्खनन प्रकरणात आता जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील ॲक्टिव मोडवर आहेत. मागील आठवड्यात डिग्रस येथील मुन्ना वाघ या रेतीमाफियावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याची रवानगी अकोला कारागृहात करण्यात आली होती. आता डिग्रस येथीलच माऊली वाघ याच्यावर देखील कारवाई करण्यात आली आहे. काल,६ जुलैला माऊली वाघ एका प्रकरणात अटकपूर्व जामीन घेऊन कोर्टाची ऑर्डर पोलीस ठाण्यात देण्यासाठी अंढेरा पोलीस ठाण्यात आला होता. मात्र पुढील कारवाईची म्हणत त्याला नव्हती..
पोलीस त्याला ताब्यात घेण्यासाठी जाणारच होते, मात्र वाघ स्वतःहून पिंजऱ्याच्या तोंडाशी आला होता. मात्र कारवाईची कुणकुण लागतात त्याने धुम ठोकली. ठाणेदार विकास पाटील यांनी एक पथक माऊली वाघ याच्या मागावर पाठवले. जालना पोलिसांची त्यांनी मदत घेतली. जालना रेल्वे स्थानकावरून मुंबईला पळून जाण्याच्या बेतात असतानाच पोलिसांनी माऊली वाघ या रेतीमाफियाला बेड्या ठोकल्या. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. माऊली वाघ याचा यशस्वी पाठलाग ठाणेदार विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ कैलास उगले आणि पोहेकॉ सोनकांबळे यांनी केला.