खांबावर दुरुस्ती करताना वायरमनला लागला शॉक ; उपचारासाठी जातानाच काळाची झडप! मोताळा तालुक्यातील घटना..

 
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) :  महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी अंतर्गतच्या मोताळा मंडळ अंतर्गत कार्यरत 'वायरमन' चा उच्च दाबाचा विद्युत धक्का (शॉक) लागल्याने मृत्यू  झाल्याची घटना आज  मोताळा तालुक्यात घडली. यामुळे महावितरणसह मोताळा तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे.
गुणवंत विश्वनाथ सांगवे असे मृत लाईनमन चे नाव आहे. 

 या गावातील एका विद्युत खांबावर चढून सांगवे हे दुरुस्तीचे काम करीत होते. यावेळी त्यांना उच्च दाबाचा धक्का लागला. हा धक्का इतका जोराचा होता ते खांबावरून अक्षरशः दूरवर फेकल्या गेले. घटना स्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी जमा झाली. त्यांनी माहिती देताच महावितरणचे अधिकारी, कर्मचारी व पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अत्यावस्थ स्थितीत गुणवंत विश्वनाथ सांगवे यांना बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्यांच्यावर काळाने झडप घातली. 

काल गुरुवारी, १६ मे रोजी संध्याकाळी मोताळा तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्याचे तांडव पहावयास मिळाले. त्यामुळे मूर्ती गावासह अनेक गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यापरिनामी अनेक गावातील हजारो ग्रामस्थांना अंधारातच रात्र घालवावी लागली. त्यामुळे महावितरणच्या मोताळा कार्यालयात तक्रारीचा खच पडला.

याची दखल घेत महावितरणने आज शुक्रवारी सकाळपासून दुरुस्तीची मोहीम सुरू केली. यादरम्यान गुणवंत सांगवे हे मूर्ती येथे दुरुस्तीचे काम करीत असताना त्यांना उच्च दाबाचा विद्युत धक्का बसला. मात्र उपचारासाठी बुलढाणा येथे नेत असतानाच सांगवे यांचा मृत्यू ओढवला. यामुळे सांगवे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. महावितरणने त्यांच्या परिवारास कमाल आर्थिक मदत करून त्यांच्या परिवारातील एकास नोकरी देण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.