बायकोचा नवऱ्यावर संशय...! बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात तक्रार; नेमकी भानगड काय?
Mar 29, 2024, 15:50 IST
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) शहरातील शांतीनगर परिसरात एका घरात चोरी झाली. घरातील वस्तू अस्ताव्यस्त झाल्या आणि कपाटातील दहा हजार रोख चोरी गेले. दारुड्या पतीनेच ते चोरी केले असावेत अश्या संशयातून पतीपासून विभक्त राहणाऱ्या एका महिलेने बुलढाणा पोलीस ठाण्यात पतीविरुद्ध चोरीची तक्रार दिली. यावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात शांतीनगर परिसरातील रहिवासी पृथ्वी चौधरी यांनी पती सचिन ईश्वर चौधरी याच्याविरुद्ध तक्रार दिली. त्यानुसार सचिन चौधरी याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे मागील सात वर्षांपासून फिर्यादी पृथ्वी चौधरी ह्या वेगळ्या राहतात. त्यांना एक सात वर्षाचा मुलगा असून तो बुलढाण्यातील एका खाजगी शाळेत पहिल्या वर्गात शिकत आहे. सकाळी ८ ते १ अशी त्याची शाळेची वेळ असते. २८ मार्च रोजी फिर्यादी पृथ्वी चौधरी या डोमेशिअल सर्टिफिकेट काढण्यासाठी गेल्या. त्याआधी त्यांची आई स्वयंपाक कामानिमित्त बाहेर गेली होती.आणि मुलगा शाळेत गेला होता. दुपारी पावणेदोन वाजेच्या दरम्यान पृथ्वी चौधरी यांना फोन आला. त्यावेळी त्यांच्या आई घरी आलेल्या होत्या.घरातील सामान अस्ताव्यस्त पडले, वस्तूंची तोडफोड झाली आणि कपाटातील दहा हजार रुपये चोरी गेल्याचे त्यांच्या आईने कळविले. पैसे पती सचिन चौधरी याने चोरी केले असावे अश्या संशयावरून बुलढाणा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. यावरून सचिन चौधरी (रा.आष्टी ,जि बीड) याच्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.