पांढऱ्या बोलेरोत "काळा तांदूळ" साखरखेर्डा पोलिसांनी पकडला! साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
Mar 26, 2023, 16:13 IST

मलकापूर पांग्रा( अमोल साळवे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): साखरखेर्डा पोलिसांनी २५ मार्चच्या संध्याकाळी केलेल्या नाकाबंदी दरम्यान दमदार कारवाई केली. पांढऱ्या बोलेरो पीक अप गाडीला अडवून त्यातून हिशोब नसलेला २० क्विंटल तांदूळ जप्त करण्यात आला. हा रेशनचा तांदूळ असावा, तो काळ्या बाजारात विक्रीला जात असावा असा संशय पोलिसांना होता, तहसीलदारांनी तपासणी अंती त्यावर शिक्का मोर्तब केले.
साखरखेर्डा येथील मेहकर टी पॉइंट वर पोलिसांनी नाकाबंदी केली होती. त्यावेळी एका संशयास्पद बोलेरो पीक अप वाहनाला पोलिसांनी पकडले. त्याची तपासणी केली असता त्यात २० क्विंटल तांदूळ आढळून आला. वाहनचालकाकडे त्याबद्दल चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. मालाच्या कुठल्याही पावत्या त्यांनी सादर न केल्याने हा रेशनचा तांदूळ असल्याचा संशय पोलिसांना आला. तहसीलदारांनी त्यावर शिक्कामोर्तब केल्याने बोलेरो पीक मध्ये असलेल्या अमोल तेजराव गवई(३७) व इस्माईल शहा मलंगशहा (५०, दोघे रा.हिवरा आश्रम) यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निवृत्ती पोफळे व नामदेव काळे करीत आहेत.