लग्न पाच दिवसांवर आले असताना मुलगी गेली पळून....

पित्याची रेल्वेसमोर आत्महत्या; चिठ्ठीत लिहिले, तिला आता कधीच घरात नका घेऊ!
 
file photo

औरंगाबाद (लाइव्ह औरंगाबाद वृत्तसेवा) ः मुलीच्या लग्नाची बापाने जय्यत तयारी केली. मंगल कार्यालय बुक केले. कपडे, दागिने खरेदी केले. पूर्वतयारीवर दोन लाख रुपये खर्च केला. मात्र लग्न पाच दिवसांवर आले असताना जिच्यासाठी ही सर्व तयारी सुरू होती ती मुलगीच पळून गेली. त्यामुळे खचलेल्या पित्याने समाजात बदनामी होईल म्हणून रेल्वेमालगाडीसमोर आत्महत्या केली. ही घटना १३ नोव्हेंबरच्या रात्री औरंगाबाद शहरातील संग्रामनगर उड्डाणपुलाच्या परिसरात घडली. संजय खंडूजी वाकेकर (४५, रा. महूनगर, सातारा परिसर,औरंगाबाद) असे  या पित्याचे नाव आहे.

संजय वाकेकर खासगी वाहनावर चालक होते. त्यांची पत्नी धुणीभांडी करते. त्यांना एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगा कंपनीत नोकरी करतो. काही दिवसांपूर्वी नात्यातील एका मुलासोबत त्यांच्या मुलीचे लग्न ठरले होते. या लग्नाची तयारी सुरू होती. डीजे, मंगल कार्यालय बुक केले. त्यासाठी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त खर्चही केला. सर्व नातेवाईक लग्नाच्या तयारीत असताना मुलगी १३ नोव्हेंबरच्या दिवशी दुपारी घरातून पळून गेली. सातारा पोलीस ठाण्यात याप्रकरणी बेपत्ता झाल्याची नोंदही करण्यात आली. मुलीला शोधण्यासाठी संजय वाकेकर यांनी परिसरात शोध घेतला. ऐनवेळी मुलीचे लग्न रद्द करावे लागेल. समाजात बदनामी होईल या भीतीने असलेल्या संजय यांनी चिकलठाण्याहून आलेल्या मालगाडी रेल्वेसमोर आत्महत्या केली. संजय वाकेकर यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून या चिठ्ठीत त्यांनी पत्नीला उद्देशून "प्रिय संगीता, मी हे जग सोडून जात आहे. मुलीला आता घरात घेऊ नका. मुलाचे लग्न व्यवस्थित करा.' असा मजकूर लिहिला आहे. अधिक तपास सातारा पोलीस ठाण्याचे पोहेकाँ राम दाभाडे करीत आहेत.