हद्दपार केलेला शेख सलीम बुलडाण्यात अवतरतो तेव्हा...

 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाणा शहरच नव्‍हे तर जिल्ह्यातून हद्दपार केलेला शेख सलीम शेख तस्लीम (३०) हा काल, ६ जानेवारीला बुलडाणा शहरातील इंदिरानगरातील आपल्या घरी आला होता. पोलिसांना ही बाब खबऱ्याने कळवताच त्‍याला पकडले. आदेशाचा भंग केला म्‍हणून त्‍याच्‍याविरुद्ध गुन्हाही दाखल केला आहे.

पोहेकाँ माधव पेटकर यांनी या प्रकरणात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. शेख सलीम कोणतीही परवानगी न घेता बुलडाण्यात आला. तो इंदिरानगरात फिरत असल्याची गोपनीय माहिती बुलडाणा शहर पोलिसांना मिळाली. सहायक पोलीस निरिक्षक अभिजित अहिरराव, पोहेकाँ लक्ष्मण कटक, पोहेकाँ महादेव इंगळे, नापोकाँ अमोल खराडे, पोकाँ सुभाष धनवे, पोकाँ गणेश बाजड, एएसआय राजेश गणेशे यांच्या पथकाने इंदिरानगर गाठले. तेव्हा शेख सलीम घरासमोर उभा दिसला. पोलिसांना पाहून तो पळू लागला.

पोलिसांनी पाठलाग करून त्‍याला पकडले. त्‍याला हद्दपारीचा आदेश रद्द झाला आहे का की बुलडाणा जिल्ह्यात येण्याची कोणाची परवानगी घेतली आहे याबद्दल विचारणा केली. मात्र त्‍याने कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे दिसून आले. त्‍याला ताब्‍यात घेऊन बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. त्‍याने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याने त्‍याच्‍याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास नापोकाँ अमोल खराडे करत आहेत.