साखरखेर्डात 'हे' काय चाललंय? इतका धुमाकूळ बरा नाही, लोक वैतागले ! घराघरात भीतीचे वातावरण..
Jul 5, 2024, 08:24 IST
साखरखेर्डा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गत महिन्यापासून साखरखेर्डातील विविध प्रभागांमध्ये अज्ञात चोरट्यांनी धुमाकुळ घातला आहे. एक दोन वेळेस नाही तर, अनेकदा घरफोडी झाल्याचे दिसून आले. यामुळे घरोघरी भीतीचे वातावरण पसरले. कधी कुणाच्या घरी चोरट्यांचे लक्ष जाईल याचा नेम नाही. एक ताजी घटना समोर आली आहे. चोरट्यांनी चार घरे फोडून तब्बल ११ लाखांचा ऐवज लंपास केला. गुरुवारी, ४ जुलैला ह्या घटना उघडकीस आल्या.
दिवसाआड घरफोडीच्या अशा घटना समोर येत असताना, हे चाललय तरी काय? चोरट्यांना पोलिसांचा धाक नाही उरला का? रात्रीच्या वेळेस गस्त केली जाते काय? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. २ जुलै रोजी मदनलाल गोडाले हे मुलीला भेटण्यासाठी अकोला येथे गेले. परत येत असताना खामगावात मुक्कामी थांबले. यानंतर ३ जुलैला अज्ञात चोरट्या टोळीने प्रथम वार्ड क्रमांक ५ मध्ये काही घरांच्या कड्या बाहेरून बंद केल्या. तेथील मिलिंद पवार यांच्या घराचे कुलूप तोडून पाच अंगठ्या आणि नगदी दहा हजार रुपये दामटले. सोबतच, शेजारील गुलाबराव इंगळे यांचेही घर फोडले. त्यातून तीस हजार लंपास केले. बाजूलाच असलेले मदनलाल गोडाले यांचेही घर फोडण्यात आले. घराचे कुलूप तोडून चोरटे आत शिरले. लोखंडी कपाट फोडून त्यातील सोन्याची अंगठी, दोन तोळ्याची साखळी, पाच तोळ्याचा राणीहार, लक्ष्मी हार, ५०० ग्राम चांदी, पाच अंगठ्या आणि नगदी रक्कम असे मिळून ११ लाखांपेक्षा जास्त ऐवज चोरट्यांनी लंपास केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर, पोलिसांना कळविण्यात आले. यानंतर अज्ञात चोरट्यांविरोधात भारतीय न्याय संहिते नुसार विद कलमान्वये गुन्हे दाखल केले. गुरुवारी, ४ जुलैला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी डॉग स्कॉटलाही पाचारण करण्यात आले होते. पोलीस अज्ञात चोरट्यांचा कसून शोध घेत आहेत.