Amazon Ad

शेगावात घडतय तरी काय ? 'ती' म्हणाली मैत्रिणीला घरी घेवुन येते अन् परत आलीच नाही! घरचे शोधून शोधून थकले; १४ वर्षीय अल्पवयीन मुलीची आई म्हणते तिला कोणीतरी...

 
शेगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) गेल्या अनेक दिवसांपासून शेगावात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. ही बाब अतिशय चिंता वाढवणारी असून शेगावात घडतंय तरी काय? असा सवाल जनतेतून उपस्थित होत आहे. एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला फुस लावून पळविल्याची घटना ७ जुलै रोजी घडली. याबाबत मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली. 
 तक्रारीनुसार, विद्या ही तिची मैत्रीण साक्षीला आपल्या घरी बोलावून आणते असे म्हणत घराबाहेर पडली. त्यानंतर बराच वेळ निघून गेला तरी देखील विद्या परतली नाही. तिच्या आईने आणि भावाने तिचा शोध घेण्यास सुरुवात केली. खूप वेळ उलटून गेला तरी पत्ता लागत नसल्याने नातेवाईकांना कळविण्यात आले. खूप शोधून मिळाली नसल्याने अखेर तिच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने मुलीला फुस लावून पळविले असे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांचा शोध सुरू आहे. मागील काही दिवसांपासून शेगावात मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. एवढेच नाही तर महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही वाढत असल्याचे दिसून येते. महिलांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला असून पोलिसांनी याबाबत वेगळी उपाय योजना राबवावी अशी मागणी होत आहे.