पळून जायचे होते,आरोपीने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरुनच मारली उडी! बोराखेडी पोलीस ठाण्यातील घटना...

 
मोताळा (अक्षय थिगळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): चोरीच्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपीने पोलिसांच्या ताब्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यासाठी चक्क त्याने पोलीस ठाण्याच्या इमारतीवरूनच उडी मारली, यामुळे पोलिसांची एकच भंबेरी उडाली बोराखेडी पोलीस ठाण्यात हा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. जखमी अवस्थेतील आरोपीला सध्या उपचारासाठी बुलडाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले आहे. वाहीद खान असे हा चोरट्यांचे नाव आहे.
   प्राप्त माहितीनुसार मोताळा तालुक्यातील राजूर येथे ५० हजार रुपयांच्या चांदीच्या वस्तू चोरट्यांनी लंपास केले होत्या. १७ जुलै रोजी ही चोरीची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरोट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान तपासादरम्यान वाहिद खान जिया उल्ला खान, शे.साबीर उर्फ साहिल शे हमीद आणि साहेल खान यांचा चोरीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाले होते. आरोपींना बोराखेडी पोलिसांनी तातडीने अटक केली होती. २० जुलै रोजी पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले होते त्यावेळी न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. दरम्यान काल,२१ जुलैच्या दुपारी प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी पोलिसांनी आरोपींना कोठडीच्या बाहेर काढले. त्यावेळी वाहीद खान याने तपास अधिकारी कपिश कशबाग यांच्या हाताला झटका देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला.  
आरोपी वाहिद खान थेट पोलीस ठाण्याच्या इमारतीवर चढला. तेथून त्याने उडी मारली, यामुळे त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला पळता आले नाही.पोलिसांनी वाहिद खानला ताब्यात घेत उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. या खळबळजनक प्रकारानंतर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी बोराखेडी पोलीस स्टेशनला भेट दिली.