हिंस्र प्राणी शेतकऱ्यांच्या जीवावर उठले! बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी ठार! गिरडा घाटातील भर-दुपारचा थरार....
Updated: Aug 29, 2024, 20:59 IST
बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात वन्य प्राण्यांचा हैदोस सुरूच आहे. रोही पिकांचा फडशा पाडत असतांनाच आता जंगली हिंस्र श्वापदे देखील शेतकऱ्यांच्या जीवावर उठली आहेत.आज २९ ऑगस्टच्या दुपारी गिरडा घाटात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुनील सुभाष जाधव (३५) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार गोंदनखेड शिवारातील आपल्या शेतात सुनील जाधव गेले होते. यावेळी अचानक दडून बसलेल्या बिबट्याने जाधव यांच्यावर हल्ला चढवला. जाधव यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याच्या ताकदीपुढे त्यांचा निभाव लागला नाही. जाधव यांच्या गळ्याला पकडुन बिबट्याने जाधव यांना दरीत नेले. गावकऱ्यांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत जाधव यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आले मात्र त्याआधीच जाधव यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. वनविभागाने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. जाधव यांना शासनाने तातडीने मदत द्यावी, बिबट्याचा ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.