UPDATE! महावितरण लाचखोर प्रकरणात तंत्रज्ञ ही अडकला! मलकापूर येथील कार्यवाहीने महावितरण मध्ये खळबळ...

 
चालत
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): मलकापूर येथील महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्याला 20 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे. याप्रकरणी वरिष्ठ तंत्रज्ञ यालाही ताब्यात घेण्यात आले आहे. यामुळे महावितरण मध्ये खळबळ उडाली आहे.
आज सोमवारी दुपारी एसीबीच्या बुलढाणा च्या पथकाने मलकापूर येथे ही कार्यवाही केली. आकाश क्षीरसागर( वय 30) असे लाचखोर अभियंत्याचे तर महादेव कडू पारधी असे वरिष्ठ तंत्रज्ञचे नाव आहे.संबंधित कर्मचाऱ्यानी लाच मागितल्याचे पुराव्यानिशी सिद्ध झाल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.. 
  तक्रारदार शेतकऱ्याच्या मुलाने बेलाड फाटा येथील श्रीकृष्ण अकॅवा आरओ प्लॅन्ट मधील औद्योगिक वीज मिटरवरून शेतीसाठी वीज वापरली. या प्रकरणी वीज चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी अभियंत्याने लाच मागितली होती. शेतकऱ्याने बुलढाणा एसीबी कडे तक्रार दिली. दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वेळोवेळी केलेल्या तपासात सर्व प्रकार उघडकीस आला. तसेच याप्रकरणी आरोपी पारधी याने अगोदर आरोपी अभियंतासाठी 60 हजार रुपये घेतल्याचे पडताळणीत सिद्ध झाले . 
त्यानंतर उर्वरित 40 हजार रुपयांची मागणी केली असता 20 हजारात तडजोड करण्यात आली. लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने एसीबीने आज 12 फेब्रुवारीला दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1984 नुसार दोन्ही आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई...
दरम्यान पोलीस उप अधीक्षक शीतल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्लिष्ट कार्यवाही करण्यात आली. यात पोलीस निरीक्षक सचिन इंगळे, प्रवीण बैरागी, जगदीश पवार, गौरव खत्री ,शैलेश सोनवणे, रंजित व्यवहारे, नितीन शेटे, अर्षद शेख यांनी ही कारवाई केली.