खामगाव ग्रामीण पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली,बोरी-अडगावातील तरुण आता दरोडेखोरांशी करणार दोन हात!; पोलिसांच्या पुढाकाराने गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन...!

 
Jnnans
खामगाव(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा):  बोरी - अडगाव (ता.खामगाव) येथे शेतातील घरात ३० मे च्या रात्री १०.३० च्या दरम्यान सशस्त्र दरोड्यात घरातील तरुण,घरातील महिला जखमी झाल्या होत्या.

याचा बोध घेत, बोरी - अडगाव येथील तरुणांनी (खामगाव ग्रामीण पोलिसांच्या) सहकार्याने आपल्या गावाच्या रक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. ग्रामीण पोलिसांच्या सहकार्याने गावातील तरुणवर्ग यापुढे चोर, दरोडेखाेरांशी दोन हात करण्यासाठी अग्रेसर राहणार आहेत. गावाच्या रक्षणासाठी तरुणांनी 'शिवराज्याभिषेक दिनाच्या' पूर्वसंध्येला ग्राम सुरक्षा दलाची स्थापना केली आहे. ग्रामीण पोलिसांनी या दलाला सर्वतोपरी सुरक्षा देण्याची ग्वाही दिली आहे.

गावातील तरुणांच्या प्रतिसादाला सकारात्मक दृष्टिकोनातून मदतीसाठी (खामगाव ग्रामीण) पोलिसांनी प्रयत्न केले आहेत. 'शिवराज्याभिषेक दिनाच्या' पूर्वसंध्येला बैठक घेत ग्राम सुरक्षा दलाला गती दिली. या बैठकीला सरपंच सौ विद्या तेजराव टिकार, पोलिस पाटील रमेश सोळंके, साहेबराव सुरवाडे, बिट अंमलदार शेख चांद, पोलिस कर्मचारी मनीष कवळकार यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'पुनरावृत्ती टाळण्यासाठी आवाहन'

ग्रामसुरक्षा दलाच्या पहिल्याच बैठकीत ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार सुरेश नाईकनवरे यांनी अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलिस दलाच्या आवाहनाला प्रतिसाद देत, काही तरुणांनी सुरक्षा दलात गस्त घालण्यासाठी होकार दिला आहे.


संशयित, अनोळखींवर ठेवणार वॉच
गावात येणाऱ्या संशयित व्यक्ती तसेच अनोळखी व्यक्तींवर ग्रामसुरक्षा दलाचे सदस्य वॉच ठेवतील.प्रत्येक संशयास्पद हालचालीची माहिती खामगाव ग्रामीण पोलिसांना वेळोवेळी देण्यात येईल.कायदा हातात न घेता, पोलिसांच्या मदतीने योग्य ती कारवाई करण्यासाठी पुढाकार घेण्याची प्रतिज्ञा 'शिवराज्याभिषेक दिनाच्या' पूर्व संध्येला घेण्यात आली आहे.

दुर्दैवी घटनेतून बोध घेत, बोरी अडगाव येथील तरुणशक्ती एकत्र आली आहे. ग्रामसुरक्षा दलाची स्थापना करण्याचा संकल्प केला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक, अप्पर पोलिस अधीक्षक, उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून ग्राम सुरक्षा दलाला मूर्त स्वरूप दिले आहे.
- सुरेश नाईकनवरे
ठाणेदार (खामगाव ग्रामीण)