भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू!
Mar 15, 2024, 20:22 IST
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा)भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने समोरुन येणाऱ्या दुचाकीस धडक दिली. या अपघातात डोक्याला जबर मार लागल्याने एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना काल १४ मार्च रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास मोताळा नांदूरा मार्गावरील विश्रामगृहाजवळ घडली आहे. अनिल विलास डोंगरे असे मृत तरुणाचे नाव आहे.
तालुक्यातील तिघ्रा येथील रहिवासी अनिल डोंगरे वय २५ हा युवक काल १४ मार्च रोजी गुरुवारी रात्री मोताळा येथून घरी तिघ्रा येथे दुचाकीने जात होता. रात्री आठ वाजेच्या सुमारास नांदूरा मार्गावरील विश्रामगृहाजवळ त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील अनिल डोंगरे याच्या डोक्याला जबर मार लागल्याने तो गंभीर झाला होता. यावेळी ग्रामस्थांच्या मदतीने त्यास रुग्णवाहिकेतून बुलडाणा येथे उपचारासाठी हलविण्यात आले होते. परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमीक उपचार करून त्यास पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजी नगर येथे हलविण्यात आले होते. उपचारा दरम्यान आज १५ मार्च रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. या घटेनमुळे तिघ्रा गावात एकच शोककळा पसरली आहे.