भरधाव मालवाहू वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

१ गंभीर; खामगाव तालुक्यातील घटना
 
 
अपघात
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः भरधाव मालवाहू वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार तर १ जण गंभीर जखमी झाला. ही घटना आज, १७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७ च्या सुमारास चिखली- खामगाव रोडवरील लोखंडा फाट्याजवळ घडली.
शिवाजी सदाशिवराव हटकर (४५, रा. हिवरखेड, ता. खामगाव) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. हटकर यांचे सासरे गंभीर जखमी झाले आहेत. आज संध्याकाळी हटकर व त्यांचे सासरे गणेशपूरवरून हिवरखेडकडे जात होते. लोखंडा फाट्याजवळ खामगावकडून येणाऱ्या मालवाहू पिकअप वाहनाने हटकर यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत हटकर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या  सासऱ्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर मालवाहू वाहनचालक वाहन उभे करून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच हिवरखेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खामगाव सामान्य  रुग्णालयात हलवला. जखमीवरही सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रात्री उशिरापर्यंत हिवरखेड पोलीस ठाण्यात मालवाहू वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.