जिल्ह्यातील दोन युवकांची आत्महत्या!

एकाने शेगावमध्ये तर बुलडाण्याच्या युवकाने मुंबईत उचलले टोकाचे पाऊल!!
 
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील दोन युवकांनी आत्‍महत्‍या केल्याची घटना समोर आली आहे. शेगावमध्ये ३२ वर्षीय युवकाने राहत्‍या घरात दोरीने गळफास घेतला तर बुलडाणा शहराजवळील माळविहीरच्या ३१ वर्षीय युवकाने मुंबईतील भाड्याच्‍या खोलीत साडीने फास आवळून घेतला. या घटनांमुळे जिल्हा हादरला असून, दोघांच्या आत्‍महत्‍येची कारणे अद्याप समोर आली नाहीत.

शेगावच्या फुलेनगरातील माळीपुरा भागात काल, १७ नोव्हेंबरला संध्याकाळी पाचच्या सुमारास रामेश्वर सुभाष म्हसने (३२) या युवकाने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला. संध्याकाळी त्याचा चुलतभाऊ महेंद्र सुरेश म्हसने हा त्याच्या घरी गेला असता घर आतून बंद होते. खिडकीतून डोकावून पहिले असता रामेश्वरने गळफास घेतल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच शेगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह सईबाई मोटे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. तपास शेगाव शहर पोलीस ठाण्याचे पोहेकाँ गजेंद्र रोहनकार करत आहेत.

दुसऱ्या घटनेत बुलडाणा शहराजवळील माळविहीर येथील अरुण त्र्यंबक गायकवाड (३१) या युवकाने १५ नोव्हेंबरला मुंबईतील भाड्याच्‍या घरात गळफास घेतला. अरुण रोजगारासाठी मुंबईला गेला होता. भाजीपाला विकण्याचे काम तो करत होता. बायको व मुलाबाळांसह दिवाळीनिमित्त गावीही येऊन गेला होता. मुंबई येथे उल्हासनगरात तो राहत होता. साडीच्या साहाय्याने त्‍याने गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. ही घटना मुलाला दिसून आली. मुंबईमध्ये राहणाऱ्या नातेवाइकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. काल, १७ नोव्हेंबरला सकाळी मृतदेह नातेवाइकांकडे सुपूर्द करण्यात आला. रात्री माळविहीरमध्ये अंत्यविधी पार पडले. अरुणच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पत्नी, आई, भाऊ असा परिवार आहे.