एटीएम कार्ड बदलून दोघांची ७० हजारांची फसवणूक ; सुंदरखेड येथील घटना!

 

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): एसबीआय शाखा सुंदरखेड येथे पैसे काढण्यासाठी गेलेल्या वृद्धाचे एटीएम कार्ड बदलून अनोळखी इसमाने फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

यासंदर्भात दगडू राम दराखे (८० वर्ष) यांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सोमवारी २९ एप्रिलला सुंदरखेड येथे एटीएमकार्ड मधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला असता पैसे निघाले नाही. त्यावेळी रांगेत उभे असलेल्या एका अनोळखी इसमाने समोर येवून पैसे काढले. त्यांनतर तो म्हणाला की, काका तुमचे पैसे निघाले नाही का? मी प्रयत्न करतो! असे म्हटल्यावर फिर्यादी दराखे यांनी विश्वासाने एटीएमकार्ड दिले. त्यानंतर त्या अनोळखी इसमाने ( वय अंदाजे ३५-४० दरम्यान) एटीएम कार्ड घेवुन मशीनमध्ये टाकले आणि पासर्वड विचारला. त्यांनतर दोनवेळेस प्रयत्न केल्यानंतर तुमचे कार्ड लॉक झाले आहे असे म्हणत त्याने एटीएम कार्ड परत केले. त्यांनतर फिर्यादी दराखे हे घरी गेल्यानंतर त्यांचे फोनवर दहा हजार रुपये निघाल्याचा मेसेज आला. त्यांनतर दर दोन मिनिटांनी परत दहा हजार रुपये निघाल्याचे आणि पाचशे रुपये निघाल्याचा संदेश फिर्यादी दराखे यांना मिळाला. असे पूर्ण चार मेसेज मिळून एकूण ३० हजार पाचशे रुपये पंजाब नॅशनल बँक खात्यातून निघाल्याचे लक्षात आले. त्यानंतर बारकाईने एटीएम कार्ड तपासले असता ते आपले नसल्याचे त्यांना समजले. आपल्यासारखीच फसवणूक अर्जुन बधु पवार (रा. देवानगर,ता. लोणार.) यांची सुद्धा झाली होती. विशेष म्हणजे त्याच अनोळखी व्यक्तीने ४० हजाराने त्यांना गंडा घातला होता. अशी माहिती फिर्यादीला मिळाली. दोघांची मिळून ७० हजार पाचशे रुपयाने फसवणूक झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे.