दोन चिमुरड्यांचा खदाणीत पडून मृत्यू; मेहकर शहरातील घटना

सायकल खेळता खेळता घडली दुर्घटना
 
 
file photo
मेहकर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः सायकल खेळता खेळता दोन चिमुरड्यांचा खदाणीत पडून बुडून मृत्यू झाला. ही घटना आज, १७ नोव्हेंबर रोजी दुपारी मेहकर -जानेफळ रोडवरील घरकुल परिसरातील खदानीजवळ घडली.

शेख मुझेफ (७) व अज्जात खान (९, दोघेही रा. घरकुल परिसर, मेहकर) अशी मृत्यू झालेल्या मुलांची नावे आहेत. दोघेही नात्याने आतेभाऊ- मामभाऊ आहेत. दोघेही आज सकाळी सायकल खेळत होते. खेळता खेळता ते जवळच असलेल्या खदाणीजवळ गेले व खदाणीत पडले. दोन्ही मुले दिसत नसल्याने परिसरात शोध सुरू करण्यात आला. मेहकर शहर पोलिसांनाही प्रकरणाची माहिती देण्यात आली.

दरम्यान, दुपारी एकच्या सुमारास खदानीवर सोयाबीनचे मात्रे धुण्यासाठी आलेल्या नागरिकांना खदाणीत सायकल पडल्याचे दिसून आले. नागरिकांनी ही माहिती मेहकर पोलिसांनी दिली. पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह मिळून आले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवले. दोन चिमुरड्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.