तलाठ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालणाऱ्या दोघांना अटक! निमगाव वायाळ शिवारात घडली होती घटना

 
Nsnd
सिंदखेडराजा(बाळासाहेब भोसले:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): निमगाव वायाळ येथील खडकपूर्णा नदीपात्रात कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकातील तलाठ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार सचिन जैस्वाल यांच्या तक्रारीवरून ४० ते ४५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान दोन महिन्यांनी आता या प्रकरणातील २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. किनगाव राजा पोलिसांनी शेख अलीम शेख आसिफ (३१) आणि विनोद श्यामराव खरात (३९) रा. डिग्रस बु ता. देऊळगावराजा अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
२६ मार्चच्या सायंकाळी निमगाव वायाळ येथील नदीपात्रात थरार घडला होता. महसूल पथकातील तलाठी यशवंत घरजाळे आणि विष्णू थोरात यांच्यावर रेती भरणारे, ट्रॅक्टरवाले, टिप्परवाले अशा ४० ते ४५ जणांनी हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्यावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला होता मात्र ते थोडक्यात बचावले होते, ट्रॅक्टरचा पाठलाग केल्यास जिवे मारू अशी धमकीही त्यांनी तलाठ्यांना दिली होती. दरम्यान याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार सचिन जैस्वाल यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.आता यातील दोन आरोपींना अटक केली असून न्यायालयाने दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.