२४ तासांत शेतकऱ्याला लुटणारे दोघे जेरबंद!

बुलडाणा शहर पोलिसांची कामगिरी
 
 
बुलडाणा शहर पोलीस ठाणे
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः बुलडाण्याच्या बाजारात भाजीपाला घेऊन आलेल्या शेतकऱ्याला दोन चोरट्यांनी लुटले. त्याच्याकडील १२ हजार रुपये किंमतीचा मोबाइलही घेऊन गेले. ही घटना काल, १२ नोव्हेंबर रोजी जयस्तंभ चौक परिसरात घडली होती. या प्रकरणात गुन्‍हा दाखल होताच अवघ्या २४ तासांत पोलिसांनी चोरट्यांना अटक केली.

कोलवड (ता. बुलडाणा) येथील शेतकरी शंकर नारायण सपकाळ (२५) यांनी या प्रकरणात काल शहर पोलीस ठाण्यात प्रकरणाची तक्रार दिली होती. भारत डिगंबर गवारगुरु (२२, वॉर्ड क्रमांक २ बुलडाणा) आणि सोनू सय्यद सलीम (२३, जोहरनगर, बुलडाणा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शंकर सपकाळ काल सकाळी भाजीपाला घेऊन विक्रीसाठी आले होते.

लघुशंका करण्यासाठी जयस्तंभ चौक परिसरातील जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पडीत पडलेल्या घरामागील मैदानात गेले होते. त्याच वेळी दोन अनोळखी व्‍यक्तींनी त्यांना पैशांची मागणी केली. सपकाळ यांनी नकार दिला असता दोघांनी मारहाण करून त्यांच्या खिशातील बारा हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून पळ काढला होता. शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाला गती दिली. डीबी पथकाचे एपीआय नीलेश लोधी यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी आज, १३ नोव्हेंबर रोजी सकाळी बुलडाणा शहरातील वॉर्ड क्रमांक २ मधून भारत गवारगुरुला ताब्यात घेतले. त्याची चौकशी केली असता त्याने मोबाइल सोनू सय्यद सलीम याला विकल्याचे सांगितले. पोलिसांनी  सोनूलाही अटक केली. याप्रकरणात तिसरा आरोपीसुद्धा असून, त्‍याचा शोध पोलीस घेत आहेत.