बुलडाण्यात सव्वा दोन लाखांची घरफोडी!

चोरट्यांचे आव्हानावर आव्हाने देणे सुरू!!
 
file photo
बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याच्या चोऱ्या, धाडसी चोऱ्या वाढल्या असून, यामुळे व्यापारी, नागरिक धास्तावलेले आहेत. चिखलीतील हत्याकांडाचा अजून तपास सुरू असतानाच बुलडाणा शहरातील चांडक ले आऊटमध्ये तब्‍बल सव्वा दोन लाख रुपयांची घरफोडी झाली आहे. ही घटना १८ नोव्‍हेंबरच्या दुपारी ४ ते आज, २० नोव्‍हेंबरच्या दुपारी १ दरम्‍यान घडल्याचे घरमालकाने तक्रारीत म्‍हटले आहे. ते १७ नोव्हेंबरला मुलीच्या ॲडमिशनसाठी मुंबईला गेले होते. आज परतले तर चोरट्यांनी घर साफ केल्याचे दिसून आले.
मोहन वसंतराव मुळे (५६) यांच्या घरी ही चोरी झाली आहे. ते व त्यांची पत्नी मुंबईला मुलीच्या अॅडमिशनसाठी गेले होते. दुसऱ्या दिवशी त्यांचा मुलगा वैभव १८ नोव्हेंबरला दुपारी ४ वाजता घराला कुलूप लावून शेजारी चावी देऊन औरंगाबादला निघून गेला. आज मोहन मुळे पत्नीसह बुलडाणा येथे दुपारी १ वाजता परतले तेव्हा घराच्या दरवाजाची कडी तुटलेली होती. घरात जाऊन बघितले असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त दिसून आले. कपाटातील सोन्याची १० ग्रॅमची चैन, ३० ग्रॅमचा नेकलेस, ५ ग्रॅमच्या दोन अंगठ्या व चांदीची काही भांडी तसेच नगदी ३६ हजार रुपये असा एकूण २ लाख २६ हजार ७५०  रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला आहे. मुळे यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक अभिजीत अहिरराव करत आहेत.