समृद्धी महामार्गावर ट्रक व आयशरची धडक; एक जागीच ठार, तिघे गंभीर जखमी
Apr 11, 2024, 20:59 IST
बुलढाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा:समृद्धी महामार्गावर आज झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार तर तिघे गंभीर जखमी झाले.आज गुरुवारी नागपूर कॅरीडोर चैनेल नबर ३१३.२ वर दुसरबीड (ता सिंदखेडराजा) नजीक ही दुर्घटना घडली.
आयशर (क्रमांक एम एच ०४ केएफ ८७४०) चे चालक रणजीत गौतम (वय ४० रा सुलतानपूर, उत्तर प्रदेश) हे आपले वाहन ट्रकच्या लेनवर चालवीत होते. जेट विमानाला लागणारे तेल ( ऑइल) घेऊन जात होते. दरम्यान पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या 'ट्रक' (क्रमांक एम एच ४८ सी क्यू ४८२८) चालक रणजीत कुमार मुकेश कुमार ( ५० सुलतानपूर ,उत्तर प्रदेश) वाहन भरधाव चालवून समोरील आयशरला मागून जोरदार धडक दिली.यामुळे आयशर सिमेंट पुलाच्या कठड्याला धडकून उलटे फिरून उलटले. यामध्ये आयशर चालक रणजीत गौतम हा जागीच ठार झाला. याच वाहनात बसलेले इतर तिघे गंभीर जखमी झाले. संतोष छोटूलाल हरिजन (वय २५ रा.मुंबई-उरण, महिंद्र गौतम वय ५०, सोनू गौतम वय ३० दोन्ही राहणार सुलतानपूर उत्तर प्रदेश अशी जखमींची नावे आहे.
अपघातग्रस्त आयशरचा अक्षरशः चुराडा झाला. दोन्ही वाहने महामार्गाच्या मधोमध असल्याने वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. महामार्ग पोलीसचे उप निरीक्षक गजानन उज्जैनकर, पोलीस हवालदार विठ्ठल काळुसे, निवृत्ती सानप व महाराष्ट्र सुरक्षा बलचे अमोल जाधव, उमेश नागरे ,जयकुमार राठोड यांनी वाहतूक थांबवून जखमीना क्यू आर व्ही टीम चे हनुमंत जायभाये ,श्रीरामे यांचे मदतीने वाहनाबाहेर काढले. जखमीवर डॉक्टर वैभव बोराडे, तायडे व चालक शिंदे ,पडघान यांनी औषध उपचार केले. जखमींना सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. घटना स्थळी बीबी पोलीस ठाण्याचे ठाणेदार संदीप इंगळे, पोलिस पाटील सरदार ,जैवळ यांनी पुढील कारवाई केली. अपघात ग्रस्त दोन्ही वाहने दुसरबीड टोलनाका येथे लावण्यात आली आहे.