डोंगरशेवलीच्या लेकीचा मेहकरच्या सारशिव मध्ये छळ! लग्न होऊन ८ वर्षे झाली अन् दोन लेकरही, आता नवरा म्हणते तू पसंत नाही! ४ लाख देशील त वागवतो म्हणते, नाहीत फारकती...

 
मेहकर( अनिल मंजुळर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): जिल्ह्यात अलीकडच्या काळात घरघुती हिंसाचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. लग्नात मिळालेला हुंडा, मानपान किंवा लग्नानंतर माहेरवरून पैसे आणण्यासाठी छळ अशी त्याची कारणे आहेत. बायकोने माहेरवरून पैसे आणले नाही तर फारकती घेण्याची मागणी करेपर्यंत नवरोबाची मजल जाते. मेहकर तालुक्यातील सारशिव येथेही कौटुंबिक छळाची घटना समोर आली आहे. डोंगरशेवली येथील लेकीचा मेहकर तालुक्यातील सारशिव येथे प्रचंड छळ झाला. नवऱ्याला ट्रॅक्टर घ्यायला ४ लाख रुपये पाहिजे होते, मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने तिच्या माहेरचे पैसे देऊ शकले नाहीत, त्यामुळे नवऱ्यासह सासरच्या मंडळींनी तिला प्रचंड त्रास दिल्याचे विवाहितेने अमडापूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
 

 किरण मिलिंद जाधव(२६) या डोंगरशेवलीच्या लेकीचा विवाह २०१४ मध्ये मेहकर तालुक्यातील सारशिवच्या मिलिंद तेजराव जाधव (३२) याच्याशी झाला होता. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या किरणला मात्र सासरी वेगळेच अनुभव आले. तिला सध्या ७ वर्षाची मुलगी आणि ४ वर्षांचा मुलगा आहे.  दरम्यान तुझ्या आईवडिलांनी लग्नात आमचा मानपान केला नाही असे म्हणत तिला टोमणे मारण्यात येत होते.

 ट्रॅक्टर घ्यायला माहेरवरुन ४ लाख रुपये आण या मागणीसाठी नवरा तिला मारहाण करत होता,सासू सासरा या कामासाठी लेकाला प्रोत्साहित करत होते. किरणच्या आईवडिलांनी अनेकदा किरणच्या पतीला व सासू सासऱ्याला समजावून सांगितले मात्र त्याचा काहीएक फरक पडला नाही. सासरची मंडळी आणखी क्रूर वागू लागली. तू मला पसंद नाही, मला फारकती दे.. एकतर ४ लाख रुपये दे नाहीतर फारकती दे अशी मागणी तिचा नवरा मिलिंद जाधव करू लागला असेही तक्रारीत म्हटले आहे.

 दरम्यान एके दिवशी किरणला तिच्या आईवडिलांदेखत मारहाण करण्यात आली. पैसे घेऊन आली नाही तर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देऊन १९ फेब्रुवारी २०२१ ला सासरच्या मंडळींनी तिला घराबाहेर हाकलून दिले. तेव्हापासून किरण माहेरी डोंगरशेवली येथे राहत आहे.  कुटुंबीयांनी, नातेवाईक मंडळींनी अनेकदा समजावून सांगून देखील किरणचा नवरा व सासचे ऐकायला तयार नाहीत. अखेर पीडित किरण ने पोलिसांत तक्रार दिली. तक्रारीवरून किरणचा नवरा मिलिंद जाधव, सासरा तेजराव जाधव, सासू कांताबाई जाधव व नणंद व नंदई विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.