कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने घेतला गळफास; जिल्हा परिषद शाळेच्या आवारातच संपवले जिवन! देऊळगाव घुबेची घटना, गावात हळहळ..

 
ghj
देऊळगाव घुबे(ऋषी भोपळे:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): कर्जबाजारीपणाला वैतागून शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. चिखली तालुक्यातील देऊळगाव घुबे येथे आज,२४ जूनच्या दुपारी दीडच्या सुमारास ही घटना उघडकीस आली.
 

चिनकुबा नारायण घुबे (६५, रा.देऊळगाव घुबे, ता.चिखली) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे.
   प्राप्त माहितीनुसार चिनकुबा घुबे यांच्याकडे ६ एकर शेती आहे. त्यांच्यावर  इंडियन ओव्हरसिस बँकेचे २ लाख  रुपये कर्ज होते. सातत्याने होणारी नापिकी यामुळे कर्ज फेडायचे कसे या विवंचनेत ते होते. त्यातच यंदा जून अर्ध्यापेक्षा संपून देखील अपेक्षित पाऊस न आल्याने उत्पन्न होईल का या विवंचनेत ते होते. आज सकाळी गुरांचा चारा पाणी करून आल्यानंतर त्यांनी जेवण केले. त्यानंतर गावातील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात असलेल्या  एका झाडाला दोरीच्या सहाय्याने त्यांनी गळफास घेतला. जिल्हा परिषद शाळेच्या आवारात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या लक्षात ही बाब आली. घटनेची माहिती मिळताच अंढेरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी चिखली येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.  अंढेरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. चिनकुबा घुबे यांना गावात महाराज म्हणून ओळखत होते. अध्यात्मिक क्षेत्रात प्रचंड रुची असलेल्या चिनकुबा घुबे यांनी टोकाचे पाऊल उचलण्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.