तीन देशी पिस्तुल, जीवंत काडतुसे आणली विकायला!

अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विशेष पथकाने घातली झडप!!
 
file photo

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशी पिस्तुल व जिवंत काडतुसांच्या विक्रीसाठी जिल्ह्यात आलेल्या एकाला अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या विशेष पथकाने रंगेहात पकडले. चिखली- खामगाव रोडवरील किन्ही महादेव फाट्याजवळ हिवरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल, २३ नोव्हेंबर रोजी दुपारी तीनच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. साबीर खान बिस्मिल्ला खान (२७, रा. बुधवारा, अंजनगाव सुर्जी, जि. अमरावती) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

किन्ही महादेव फाट्यावर एक व्यक्ती देशी पिस्तुल व जिवंत काडतुसे विक्री करण्यासाठी काळ्या-लाल रंगाच्या बजाज डिस्कव्‍हरने येत असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती श्रवण दत्त यांच्या विशेष पथकाला मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस पथकाने सापळा रचून किन्ही महादेव फाट्याजवळ संशयित व्यक्‍तीला अडवले व  त्याची अंगझडती घेतली असता गाडीच्या डिक्कीत ३ देशी बनावटीचे पिस्तुल व ४ जिवंत काडतुसे मिळून आले. त्याचा नाव, गाव, पत्ता विचारला असता त्याने साबीर खान बिस्मिल्ला खान (रा. बुधवारा, अंजनगाव सुर्जी) असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याच्याकडील मोटारसायकल, ३ देशी पिस्तुल व ४  जिवंत काडतुसे असा एकूण ८७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्‍याला अटक केली. पो.ना. गजानन आहेर यांच्या तक्रारीवरून हिवरखेड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली व अप्पर पोलीस अधीक्षक श्रवण दत्त (खामगाव) यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ सूर्यवंशी, पोहेकाँ गजानन बोरसे, पो.ना. गजानन आहेर, पो.ना. रघुनाथ जाधव, पो.ना. संदीप टाकसाळ, पो.ना. श्रीकृष्ण नारखेडे, पो.काँ. राम धामोडे यांनी केली.

st