बुलडाण्याच्या तीन पोलिसांना लाज नाही वाटली; प्लॉटच्या व्यवहारात फसवणूक व खंडणी मागितल्याप्रकरणी तीन पोलिसांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल;

तक्रारदाराला दिली होती खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी! पत्रकारांना माहिती देण्यास पोलिसांकडून टाळाटाळ...

 
klvmdl

बुलडाणा(बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): पोलीस म्हटल की सामान्य जनतेला त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती वाटते..अर्थात ते स्वाभाविक आहे  कारण सज्जनांचे दुर्जन लोकांपासून  रक्षण करण्याचे पोलिसांचे काम..कोणत्या क्षणी कोणता फोन येईल आणि सगळ सोडून कर्तव्यावर हजर रहावे लागेल याचा नेम नाही..मात्र प्रत्येक चांगल्या क्षेत्रात काही अपवाद असतातच की..चांगल्या आंब्याच्या पेटीतही दोन चार सडके आंबे निघतातच की...हो..हा मुद्दा इथ उपस्थित करण्याचं कारण आहे धडाकेबाज कारवायांनी दुर्जांनांना घाम फोडणाऱ्या बुलडाणा शहर पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांनी लज्जास्पद कृत्य केल्याचं उघडकीस आलंय..एका प्लॉटच्या व्यवहारात फसवणूक आणि खंडणीचे हे प्रकरण आहे..तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचं आणि ३ पोलिसांनी खंडणी मागितल्याचं तक्राकर्त्याच म्हणणं आहे..एकूण ६ जणांच्या विरोधात बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कर्मचारी प्रकाश दराडे, मोरे आणि नागरे ही पोलिसांच्या वर्दीला काळीमा फासणाऱ्यांची नावे आहेत.त्याशिवाय विशाल पंडितराव मोहिते, अजय रामसिंग परदेशी , शुभम जीवन पांडे तिघे रा. धाड ही इतर तीन आरोपींची नावे आहेत. जालना जिल्ह्यातील  भोकरदन तालुक्यातील राजूर येथील मयूर रामेश्वर हाजबे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.  बुलडाणा शहरातील धाड नाका परिसरात मयूर हजबे यांना प्लॉट खरेदी करून देतो म्हणून आरोपींनी त्यांना विश्वासात घेतले, इसार पावतीचे ४० लाख रुपये घेतले मात्र त्यानंतर मयूर हाजबे यांना प्लॉट बाबत झुलवत ठेवण्यात आले. मयुर हाजबे यांच्याकडून घेतलेले ४० लाख परत करावे लागतील म्हणून  धाडच्या तिन आरोपींनी एक शक्कल लढवली. ३ पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने मयुर हाजबे यांनाच अवैध बंदूक वापरण्याच्या प्रकरणात जेलात टाकण्याची भीती दाखवण्यात आली. शुभम पांडे यांच्या मध्यस्थीने पोलीस कर्मचारी दराडे, मोरे, नागरे यांच्या मदतीने हे षडयंत्र रचण्यात आले तक्रार कर्त्याला गजाआड करण्याची भीती दाखवून  खंडणी उकळण्याचा प्रयत्नही या प्रकरणात झाला.

मयूर हाजबे यांच्याकडून कोरे बाँड पेपर, कोरे चेक व इतर कागद पत्रे घेण्यात आली. चेकवर तक्रार कर्त्याची खोटी सही देखील करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत आहे. प्लॉट खरेदी करून द्यावा लागू नये म्हणून त्या ३  पोलिसांची मदत घेऊन इसार म्हणून दिलेले पैसे हडप करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीवरुन ३ पोलिसांसह सहा  जणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे..

पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ...

दरम्यान या प्रकरणाची कुणकुण लागल्यानंतर वृत्त संकलनासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या पत्रकारांना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येत होती. त्यामुळे त्या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न कुणाकडून तरी होत असल्याचे दिसून आले, किंवा त्या तिघांच्या चौकशीत आपलेच नाव समोर आले तर ...अशी भीतीही काहींना वाटली असावी..

एसपी काय भूमिका घेतात...

दरम्यान खंडणी आणि फसवणुकीसारखा मोठा प्रकार उघडकीस आल्याने या प्रकरणात आता एसपी सुनील कडासने काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरेल..अर्थात फसवणुकीसारखा गंभीर गुन्हा दाखल करण्याआधीच अशी प्रकरणे चौकशीवर ठेवण्यात आलेली असतात, त्यामुळे चौकशी अंतीच हा गुन्हा दाखल झालेला असल्याने एसपी कडासने यांच्याकडून खाकी वर्दीला काळिमा फासणाऱ्या त्या तिघांवर कडक कारवाईची अपेक्षा आहे..