थर्टिफर्स्टला उधळली जुगाऱ्यांची पार्टी; सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त, अंढेरा पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 
जुगार
देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः थर्टिफर्स्टच्या दिवशी जुगाऱ्यांच्या पार्टीवर अंढेरा पोलिसांनी छापा मारला. यावेळी तीन जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून सव्वादोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. काही आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले असले तरी त्यांच्या मोटारसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. काल, ३१ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ च्या सुमारास मेरा बुद्रूक शिवारात ही कारवाई करण्यात आली.

मेरा बुद्रूक शिवारात जुगाऱ्याची पार्टी सुरू असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून अंढेरा पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे, पोहेकाँ कैलास उगले यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे छापेमारी केली असता राम परमेश्वर जाधव (३०, रा. हिवरा आश्रम, ता. मेहकर), राजेंद्र रावसाहेब पडघान (४२) व गणेश बद्रीनाथ गायकवाड (दोघे रा. मेरा बुद्रूक ता. चिखली) यांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून पत्ते, रोख ४ हजार १७० रुपये व घटनास्थळावरून एक बुलेट, एक पल्सर, दोन स्प्लेंडर मोटारसायकल, ड्रीम युगा मोटारसायकल, एक बजाज मोटारसायकल अशा एकूण ६ मोटारसायकली असा एकूण २ लाख २४ हजार १७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश हिवरकर, पोलीस उपनिरीक्षक मनोज वासाडे, पोहेकाँ कैलास उगले, पोहेकाँ अच्युतराव सिरसाट, गजानन वाघ यांनी पार पाडली.