थर्टिफर्स्ट... दारू पिऊन वाहनावर दिसाल तर खैर नाही..!; खामगावात दोघांविरुद्ध गुन्हा

 
file photo
खामगाव (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः थर्टिफर्स्टच्या निमित्ताने दारू पिऊन गाड्या चालविणाऱ्यांविरुद्ध जिल्ह्यातील पोलिसांनी मोहीम उघडली आहे. जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक शांतिकुमार पाटील यांनी तशी सूचनाच वाहतूक पोलीस आणि जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांना केली आहे. त्यामुळे दारू पिऊन सुसाट गाड्या चालविणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी थेट गुन्हा दाखल करणे सुरू केले आहे. खामगावातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदकुमार साहेबराव मंजुळकर (२८, रा. खामखेड, ता. पातूर, जि. अकोला) हा मोटारसायकलीने भरधाव सुटाळ्याकडे जात होता. वाहतूक पोलिसांनी संशयावरून त्याला अडवले. त्याच्या तोंडाचा आंबट उग्र वास येत होता. वैद्यकीय तपासणीत त्याने दारू पिल्याचे समोर आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. महेंद्र सारंगधर तनपुरे (२४, रा. चिखला खुर्द, ता. खामगाव) हा सुद्धा सुसाट दुचाकी पळवत होता. त्याला वाहतूक पोलिसांनी अडविले असता त्याच्याही तोंडाचा आंबट उग्र वास येत होता. सामान्य रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तो दारू पिल्याचे निष्पन्‍न झाल्याने त्याच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला.