चोरट्यांनो, देवाला तरी सोडा! मोताळ्यात श्रींचे मंदिर फोडले!!

 
thief
मोताळा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः मोताळा शहरातील आदर्शनगरातील श्री गजानन महाराजांचे मंदिर दोन चोरट्यांनी फोडून दानपेटीतील ४० हजार ते ४२ हजारांपर्यंतची रक्‍कम चोरून नेली आहे. या प्रकरणी संस्‍थानचे अध्यक्ष श्रीकृष्ण फेंगडे यांनी बोराखेडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्‍यावरून चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

काल सकाळी सहाच्या सुमारास मंदिराचे सुरक्षारक्षक राजेश देशमुख यांनी श्री. फेंगडे यांना मंदिरात चोरी झाल्याची माहिती दिली. त्‍यामुळे ते ट्रस्टचे सदस्य अरुण पाटील, कृष्णराव देशमुख, डाॅ. शरद पाटील, संतोष टावरी, डाॅ. महाजन, अनिल नाफडे, आर. बी. राजपूत, लताबाई पारस्कर व अमोल मापारी यांच्यासह मंदिराकडे आले. त्‍यांना मंदिराच्या गाभाऱ्यात येतानाच्या गेटचे कुलूप तुटलेले दिसले.

सदस्यांनी मंदिरात लावलेले सीसीटीव्ही फूटेज चेक केले असता फुटेजमध्ये दोन चोरटे दिसत आहेत. एकाच्या अंगात लाल स्वेटर असून, चेहरा पूर्ण झाकलेला व हातात हँन्डग्लोज घातलेले व दुसऱ्याने नाकावर रूमाल बांधलेला व त्याच्या हातात निळी बॅग असल्याचे  फूटेजमध्ये दिसून आले. मूर्तीसमोर ठेवलेली लाकडी दानपेटी चोरट्यांनी फोडून त्‍यातील ४० ते ४२ हजार रुपये लंपास केल्याचे दिसून आले. ही घटना ४ जानेवारीच्या पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. तपास पोलीस उपनिरिक्षक अशोक रोकडे करत आहेत.