चोरट्यांनी तहसीलही नाही सोडले!; बांधकाम साहित्य लांबवले!

बुलडाणा शहरातील घटना
 
buldana ps
बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तहसील कार्यालयामागे ठेवलेले ८५ हजार रुपयांचे बांधकाम साहित्य चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास घडली.
 
महादेव सुरेश गवळी (३१, रा. खुटपुरी ता. खामगाव) हे पलसिध्द कन्स्ट्रक्शन कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करतात. सध्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे निवडणूक आयोगाच्‍या इव्‍हीएम, व्‍हीव्‍हीपॅड ठेवण्यासाठी स्‍टोअर रूम तहसील कार्यालयात बांधली जात आहे. बांधकामासाठी लागणारी सेंट्रिंग प्लेट, बल्ल्या, सिमेंट, रेती, गिट्टी, इलेक्ट्रीक सामान तहसील कार्यालयामागे ठेवले होते. त्याच्या देखरेखीसाठी चौकीदारसुध्दा ठेवला आहे. ३१ ऑक्‍टोबरला सकाळी लेबर कॉन्ट्रॅक्टर गणेश मेटकर यांनी फोन करून बांधकाम साइटवर लोखंडाची चोरी झाल्याचे कळवले. चोरट्यांनी ८५ हजार रुपयांचे लोखंड चोरून नेल्याचे दिसून आले. लेबर कॉन्ट्रॅक्टरने त्‍यांना सांगितले, की पहाटे तीनला आम्ही झोपेतून उठलो तेव्हा चोरी करणारे लोक आम्हाला पाहून पिवळ्या रंगाच्या अॅपेमध्ये पळून गेले. चोरीची तक्रार काल, २ नोव्हेंबरला बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. तपास ठाणेदार श्री. साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक प्रकाश दराडे करत आहेत.