घरमालक बाहेरगावी अन चोरटे घरात! खामगावच्या हंसराज नगरात कुलूप तोडून चोरट्यांचा सोन्या, चांदीवर डल्ला..!

 
Fgk
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): घरमालक बाहेरगावी गेल्याची संधी साधून खामगावच्या हंसराज नगर येथे चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून सोन्या, चांदीच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना समोर आली आहे.
प्राप्त माहीतीनुसार रवींद्र मनोहर उपाध्याय वय (४०) वर्ष रा.हंसराज नगर (खामगाव) हे कामानिमित्याने आपल्या कुटुंबासोबत बाहेरगावी गेले होते. याच संधीचा फायदा घेत,२० ऑगस्ट ते २१ ऑगस्ट च्या सकाळी ६.३० वाजताच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील अलमारीमध्ये एक जुने सोन्याचे मंगळसूत्र वजन ४ तोळे किंमत ४८ हजार रुपये, चांदीचे पैजन बिचवे वजन ५ तोळे किंमत ७ हजार ५०० रुपये, असा एकूण ५५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. तशी रवींद्र उपाध्याय यांनी आज २१ ऑगस्ट रोजी खामगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास नापोकॉ सागर भगत करीत आहेत.