पोलिसांना चोरांचे चॅलेंज! सुलतानपुरच्या आठवडी बाजारात पोलीस चौकीशेजारीच दोन महिलांना ठगवले! महिला पोलिस चौकीत तक्रार द्यायला गेल्या पण.....

 
bvncm
सुलतानपूर(सतीश तेजनकर: बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): सुलतानपुरच्या आठवडी बाजारात दोन  वृद्ध महिलांना चोरट्यांनी ठरवण्याचा प्रकार समोर आला आहे. तुम्हाला फ्री राशन देतो, पण तुमच्या अंगावरील दागिने थैलीत टाकून ठेवा असे म्हणत दोन भामट्या चोरट्यांनी हातचलाखी करीत महिलांच्या अंगावरील सोन्याचे दागिने लांबवले..विशेष भर बाजारातल्या पोलिस चौकीशेजारीच हा प्रकार घडल्याने मेहकर पोलिसांच्या कार्यक्षमतेवर जनतेला विश्वास नसला तरी चोरट्यांना मात्र पुरेपूर विश्वास असल्याचे दिसून आले.
 

लोणार तालुक्यातील सुलतानपुर ही मोठी बाजारपेठ आहे. दर मंगळवारी इथे आठवडी बाजार असल्याने मोठी गर्दी होते. याठिकाणी मेहकर पोलीस स्टेशन अंतर्गत येणारी पोलीस चौकी आहे. याआधी या पोलिस चौकीवर एक पोलिस कर्मचारी तैनात होता मात्र सध्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांची नियुक्ती याठिकाणी करण्यात आलेली आहे. तर..आज झाले असे की वडगाव तेजन येथील सौ. सिंधुबाई तुकाराम चौगुले व शशिकला शिवराम जाधव या अंदाजे ६० ते ६५ वर्षीय महिला लोणारच्या आठवडी बाजारात आल्या होत्या. त्यांना दोन अनोळखी पुरुष भेटले. तुम्हाला फ्री राशन द्यायचे आहे  असे सांगून त्या दोघांनी त्या दोघींना पोलीस चौकीसमोरून भोलेनाथ वाईन बार शेजारी असलेल्या एटीएम मशीन समोर बोलावून नेले. फ्री राशन द्यायचे असल्याने तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने पिशवीत काढून ठेवा असे त्या दोघांनी सांगीतले. त्यानंतर एका महिलेला काही अंतरावर नेऊन दुसऱ्या महिलेच्या हातातील पिशवी घेऊन चोरटे पसार झाले..

 महिला पोलिस चौकीत गेल्या पण चौकी बंद, पोलीस कर्मचारी फोन उचलेना..

 दरम्यान या घटनेनंतर बाजारात एकच खळबळ उडाली. महिला पोलिसांची मदत घेण्यासाठी पोलीस चौकीत गेल्या पण पोलीस चौकी बंद होती.  पत्रकार सतीश तेजनकर यांना माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले. त्यांनी पोलीस चौकीत हजर नसलेल्या पोलिस कर्मचारी राजेश जाधव यांना फोन करून घडलेली घटना सांगण्याचा प्रयत्न केला मात्र बराच वेळ फोन करून देखील फोन उचलण्यात आला नाही वृत्त लीहीपर्यंत महिला पोलिस चौकी उघडण्याची वाट पाहत होत्या.