चक्क पोलिसांवरच पाळत ठेवत वाळू माफियांची लाईन क्लिअर करत होते, पोलिसांनी 'त्या' दोघांना उचलुन आणले!
May 9, 2024, 17:36 IST
खामगाव(भागवत राऊत:बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा): हल्ली जिल्ह्यात वाळू माफियांनी उत आणल्याचे चित्र दिसत आहे. भरधाव वेगाने निष्काळजीपणे वाळूचे वाहने चालवून रस्त्यात अपघाताच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच पोलिसांवर पाळत ठेवून वाळू तस्करीचा मार्ग मोकळा करून देणारे दोन भामटे पोलिसांनी पकडले आहेत.
पोलीस व महसूल यंत्रणा वाळू माफियांच्या वाहनावर कारवाई करण्याआधीच त्यांना सुगावा लागत असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात पोलीस व महसूल अधिकाऱ्यांना अडचणी निर्माण होतात. पोलीस, महसूल अधिकारी कारवाई करण्याआधीच वाळु माफिया पसार होऊन जातात. या वाळू माफियांचे खबरी चक्क पोलीस व महसूल अधिकारी यांच्यावर पाळत ठेवून त्यांना पोलीस व महसूल अधिकारी यांची माहिती पुरवत असतात. याप्रकरणी आज ९ मे रोजी जलंब रस्त्यावरील वाडी (खामगाव) जवळच्या पुलाजवळ मध्यरात्री १ वाजताच्या दरम्यान अक्षय श्रीराम तांबटकर (३०), मोहन प्रीतम धोटे (३१) दोघे रा. माटरगाव हे पोलिसांना संशयास्पद फिरताना दिसून आले. दोघेही वाळू तस्करी करणाऱ्यांना पोलिसांची व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांची माहिती पुरवत असल्याच्या संशयावरून खामगाव शहर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले व सूचनापत्र देऊन सोडून दिले आहे.पुढील तपास पोहेकॉ गजानन पाटील करीत आहेत.